कोण नीरव मोदी ? अमेरिकेत ना चर्चा, ना माहिती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:43 PM2018-02-25T23:43:38+5:302018-02-25T23:43:38+5:30
हिरे व्यापारी नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँकेची भारतात कितीही चर्चा होत असली तरी अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क आणि राजनैतिक केंद्र असलेल्या वॉशिंग्टन शहरांत मोदी नावाबद्दल काहीच माहिती नाही व त्याच्यावर येथे काही चर्चादेखील नाही.
पुनीत अहलुवालिया
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : हिरे व्यापारी नीरव मोदी आणि पंजाब नॅशनल बँकेची भारतात कितीही चर्चा होत असली तरी अमेरिकेचे आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्क आणि राजनैतिक केंद्र असलेल्या वॉशिंग्टन शहरांत मोदी नावाबद्दल काहीच माहिती नाही व त्याच्यावर येथे काही चर्चादेखील नाही. याचे कारण असे असू शकते की लक्षावधी भारतीयांसारखाच तो जर येथे असेल तर त्याचीही नोंद सरकार दप्तरी एखादा पर्यटक किंवा व्यावसायिक अशीच असेल. याशिवाय भारत सरकारने अद्याप नीरव मोदीच्या शोधासाठी किंवा त्याच्या ठावठिकाणासाठी येथे अधिकृतपणे ना कोणती विनंती केली ना कोणत्या सहकार्याची पत्राद्वारे मागणी केली. येथील प्रसार माध्यमांना नीरव मोदीमध्येही काही उत्सुकता नाही. त्यांच्यासाठी मोदी हा चेहरा नसलेली व्यक्ती आहे व त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी सध्या तरी प्रसार माध्यमांचा कल नाही.
येथे वास्तव्यास असलेले भारतीय इंटरनेटवर भारतीय वाहिन्यांद्वारे नीरव मोदीबद्दल माहिती घेतात. त्याने किती मोठा आर्थिक घोटाळा केला हे त्यांना माहिती करून घ्यायचे असते व त्याला पकडण्यासाठीभारत सरकार काय उपाययोजना करते याची.
न्यूयॉर्कमध्ये नीरव मोदी स्टोअर आहे. परंतु, तो स्वत: ते चालवतो की त्याची फ्रँचाईसी दिली आहे की भागीदारीत ते चालवले जाते याबद्दल येथे काहीही माहिती नाही. त्याच्याशी संबंधित आणखी एका स्टोअरवरील एका कर्मचाºयाने भारतीय राजकीय वर्तुळात नीरव मोदीमुळे निर्माण झालेल्या वादळाबाबत काही माहिती देण्यास नकार दिला व मी एवढेच सांगू शकतो की सध्या तरी येथील हे स्टोअर बंद करण्याबाबत माझ्याकडे काही माहिती नाही, असे तो म्हणाला.
भारतीय प्रसारमाध्यमांत अशी चर्चा आहे की न्यूयॉर्कमध्ये त्याचे मोठे हॉटेल आहे. परंतु येथे फक्त नीरव मोदीच्या नावाने हॉटेलचा शोध घेणे अशक्य आहे. कारण, केवळ नावावरून हॉटेलची माहिती कोणी देत नाही. अमेरिका हा कायदे व नियमांचे पालन करणारा देश आहे व जोपर्यंत त्याच्या सुरक्षा यंत्रणा त्याच्याकडून कोणत्याही ग्राहकाची माहिती मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडून माहिती मिळणार नाही. कोणत्याही सामान्य माणसाला हॉटेलचे रजिस्टर तपासून नीरव मोदी जर कोणत्या हॉटेलमध्ये आहे तर ते कुठे आहे व त्याचे नाव काय हे शोधणे अशक्य आहे. नीरव मोदीबाबत भारत सरकारकडून कदाचित ही प्रक्रिया सुरू होत असावी परंतु, याप्रकरणी पहिल्यांदा येथे एक घडले आहे की येथे राहणारा प्रवासी भारतीय समाज याबाबत मदत करायला तयार आहे. त्याचे म्हणणे असे आहे की भारतीय हजारो मैलांवरून येथे येतात. कष्ट, निष्ठा आणि सावधगिरीच्या पायावर आपले एक स्थान तयार करतात व त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये आत्मीय, सांस्कृतिक व आर्थिक दुवा बनतात. अशात नीरव मोदीसारख्या लोकांमुळे भारतीयांच्या प्रतिष्ठेला झळ बसण्याची शंका निर्माण होते.