भारत पेट्रोलिअमची मालकी कोणाकडे? स्वदेशी की अमेरिकी कंपनी विकत घेणार, तीनच कंपन्यांना रस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 08:55 AM2020-12-03T08:55:47+5:302020-12-03T08:56:48+5:30
Bharat Petroleum : बीपीसीएलचा लिलाव होणार याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आल्याचे धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. दीपमने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मात्र, यावर अधिक माहिती देण्यास प्रधान यांनी नकार दिला.
केंद्र सरकार देशाची दुसरी सर्वात मोठी तेल कंपनी भारत पेट्रोलिअम (BPCL) मधील आपला पूर्ण 52.98 टक्के हिस्सा विकत आहे. यावरून देशभरातून जोरदार टीका होत असताना भारत पेट्रोलिअमच्या खरेदीसाठी तीन कंपन्यांनी बोली लावली आहे.
पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी सांगितले की, भारत पेट्रोलिअमच्या खासगीकरणासाठी तीन कंपन्यांनी रस दाखविला आहे. यासाठी त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट पत्र जमा केले असून सुरुवातीच्या बोलीवरून या कंपन्यांची लिलावामध्ये निवड केली जाईल. पात्र कंपन्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये लिलावात भाग घेता येणार आहे.
खाण क्षेत्र आणि तेल क्षेत्रात काम करणाऱ्या वेदांताने १८ नोव्हेंबरला याची कबुली दिली होती. यावेळी कंपनीने सांगितले होते की, केंद्र सरकारची बीपीसीएल खरेदी करण्यासाठी कंपनीने केंद्राला पत्र दिले आहे. महत्वाचे म्हणजे बीपीसीएलमध्ये अमेरिकेच्या दोन कंपन्या इच्छुक आहेत. यापैकी एक अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट आहे. यामुळे देशी कंपनीच्या ताब्यात बीपीसीएल जाणार की अमेरिकेच्या हे लिलावातील बोलीच ठरविणार आहेत.
बीपीसीएलचा लिलाव होणार याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आल्याचे धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. दीपमने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मात्र, यावर अधिक माहिती देण्यास प्रधान यांनी नकार दिला. बीपीसीएलच्या विक्रीचे नियोजन करणाऱ्या दीपमचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी १६ नोव्हेंबरला ट्विट करत बोलीच्या अंतिम दिवशी काही कंपन्यांनी भारत पेट्रोलिअममध्ये रुची दाखविली आहे.
आणखी कंपन्या विकणार
धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांचे खासगीकरण करण्याची योजना बनवत आहे. यामुळे या कंपन्यांची प्रतिस्पर्धा करण्याची क्षमता वाढणार आहे. या कंपन्या व्यावसायिक बनतील. बीएसईमध्ये रजिस्टर असलेली वेदांता लि. आणि त्यांची लंडन येथील मूळ कंपनी वेदांता रिसोर्सेसद्वारे गठीत केलेली विंगने १६ नोव्हेंबरला अर्ज सादर केला.
रिलायन्सने हात आखडता घेतला
बीपीसीएलमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीला मुख्य दावेदार मानले जात होते. मात्र, रिलायन्सने त्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर सऊदी अरामको, ब्रिटिश पेट्रोलिअम, टोटल सारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील पाठ फिरविली आहे.