Eknath Shinde: गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतयं? शिंदेंच्या शिलेदारानं मांडलं पगाराचं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:54 PM2022-06-25T18:54:56+5:302022-06-25T18:56:23+5:30
आमदारांना चांगली पगार आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च ते स्वत: भागवू शकतात. मात्र, जर आम्हाल कोणी निमंत्रित केलं असेल, जसं की एकनाथ शिंदेंनी आमंत्रित केलं आहे.
मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या ५ दिवसांपासून मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून वेगळा झाल्याने राजकीय उलथापालथ पाहायल मिळत आहे. शिंदे गटासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं असून आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यातच, शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला. शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतो, यासंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
आमदारांना चांगली पगार आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च ते स्वत: भागवू शकतात. मात्र, जर आम्हाल कोणी निमंत्रित केलं असेल, जसं की एकनाथ शिंदेंनी आमंत्रित केलं आहे. पण, आम्ही अधिकृतपणे त्याचा खर्च भरतो, कन्सेशन घेतो. मात्र, पैसे भरुनच आम्ही इथं राहतो, मोफत राहत नाही. कुठलाही पक्ष आमचा खर्च करत नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बोलावलं, त्यांनी सांगितलं या फ्लाईटने या, आम्ही गेलो. जे काही पेमेंट असेल ते आम्ही करतो, असे दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच, तुम्हाला का वाटतं की भाजपच यामागे आहे, तसं नाही भाजप यामागे अजिबात नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजप शिवसेनेनं एकत्र राहिले पाहिजे
मी राष्ट्रवादीतच होतो, माझे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र, माझ्या एकट्याचे संबंध असून काय उपयोग. आमचे आमदार राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलचे गाऱ्हाणे आमच्याकडे मांडत होते. मी कोकणात एवढी मोठी लढाई केली. मलासुद्धा पंतप्रधान कार्यालयातून बोलाविण्यात आलं होतं. मी का नाही गेलो, कारण मराठी माणसाच्या मागे शिवसेना उभी राहते. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना लढते. मी दिल्लीवरुन एवढ्या मोठ्या माणसाला न भेटता परत आलो. विशेष म्हणजे मी सुरुवातीपासूनच पक्षप्रमुखांना सांगत आहे की, भाजप आणि शिवसेनेनं एकत्रच राहिलं पाहिजे.
मातोश्रींबद्दल मोदींना अतिशय प्रेम
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान जेव्हा एका दिशेने चालतात तेव्हा ते राज्य मोठं होतं. महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असलेलं राज्य आहे. ज्यावेळेला महाराष्ट्र मोठा होईल, भारतसुद्धा मोठा होईल. पंतप्रधान मोदींना मातोश्रीबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल अतिशय प्रेम आहे. तसं असतानाही केवळ राज्यातील कोणी आपल्याला त्रास देत आहे, म्हणून भूमिका वेगळी घेतली. पण, ते तिथं बोललं जाऊ शकलं असतं, असेही दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.