तीन मुलांच्या आईवर कुणी कशाला बलात्कार करेल?; भाजपा आमदाराचे अजब तर्कट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 10:35 AM2018-04-12T10:35:33+5:302018-04-12T10:35:33+5:30
मी मानशास्त्रीयदृष्ट्या बोलत आहे. कोणीही तीन मुलांच्या आईवर बलात्कार करणार नाही.
लखनऊ: उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या योगी सरकारला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. बैरिया येथील भाजपा आमदार सुरेंद्र सिंग यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे या टीकेचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. सुरेंद्र सिंह यांनी आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचे समर्थन करताना 'कोणीही तीन मुलांच्या आईवर कशाला बलात्कार करेल', असे चीड आणणारे विधान केले आहे. मी मानशास्त्रीयदृष्ट्या बोलत आहे. कोणीही तीन मुलांच्या आईवर बलात्कार करणार नाही. हे शक्यच नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार सेनगर यांच्याविरुद्ध रचलेले षडयंत्र आहे. पीडितेच्या वडिलांना कोणीतरी मारहाण केली असेल, पण मी बलात्काराचा आरोप निराधार मानतो, असे सुरेंद्र सिंह यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणी गुरूवारी सकाळी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ते बुधवारी रात्री एसएसपींच्या निवासस्थानावरून आत्मसमर्पण न करताच माघारी परतले होते. या सामूहिक बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात भादंवि कलम 363, 366, 376 आणि 506 तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेनगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उन्नाव येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर बुधवारी रात्री आत्मसमर्पण करणास असल्याचे वृत्त आले होते. मात्र प्रत्यक्षात ते आत्मसमर्पण न करताच ते एसएसपींच्या निवासस्थानातून माघारी परतले. मात्र एसएसपी हे उपस्थित नसल्याने आपण माघारी जात असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.