रसगुल्ला कुणाचा? पश्चिम बंगाल, ओडिशात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2015 12:07 AM2015-10-01T00:07:39+5:302015-10-01T00:07:39+5:30
रसगुल्ल्याचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चोखंदळ खवय्ये त्यावर तुटून पडतात. तथापि, या मधुर, रसाळ पदार्थाचे मूळ शोधण्याच्या फंदात कुणी आजवर पडले नव्हते
कोलकाता : रसगुल्ल्याचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चोखंदळ खवय्ये त्यावर तुटून पडतात. तथापि, या मधुर, रसाळ पदार्थाचे मूळ शोधण्याच्या फंदात कुणी आजवर पडले नव्हते; पण आता रसगुल्ला मूळचा आमचाच, असे म्हणत ओडिशा आणि पश्चिम बंगालने टॅगसाठी परस्परांविरुद्ध युद्ध छेडले आहे.
प. बंगालने अलीकडेच भौगोलिक संकेतांक (जिओग्राफिकल इंडिकेशन-जीआय) टॅगसाठी अर्ज करीत रसगुल्ल्यावर दावा सांगितल्यामुळे हा वाद समोर आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भक्कम पाठिंबा मिळताच आम्ही जीआयकडे १८ सप्टेंबर रोजी अर्ज सादर केला आहे, असे प. बंगालचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री रविरंजन चटोपाध्याय यांनी सांगितले.
‘रसगुल्ल्याचा जन्म बंगालमध्येच झाला असून, दास कुटुंबाकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्ही त्याचे मूळ सिद्ध करण्यासाठी तपशीलवार दस्तऐवज (डोझियर) तयार केले आहेत. इतिहासकार हरिपदा भौमिक यांच्याकडेही दाखले आहेत. बंगालची बाब पाहता रसगुल्ल्याचा मूळ शोधण्याचा प्रश्नच येत नाही’, असे प. बंगालचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री रविरंजन चटोपाध्याय यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)