आरएसएस सरकार्यवाहपदी कोण? भोपाळच्या बैठकीत विचार; मार्च २0१८च्या सभेत सर्वसंमतीने निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:42 AM2017-10-13T00:42:55+5:302017-10-13T00:43:08+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा उत्तराधिकारी कोण? भोपाळ येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नव्या सरकार्यवाहांच्या निवडीबाबत गांभीर्याने विचार विनिमय सुरू आहे.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा उत्तराधिकारी कोण? भोपाळ येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नव्या सरकार्यवाहांच्या निवडीबाबत गांभीर्याने विचार विनिमय सुरू आहे. औपचारिक निवड मार्च २0१८ मध्ये संघाच्या नागपूरमधील प्रतिनिधी सभेत होईल, अशी माहिती आहे.
रा.स्व. संघामध्ये सरसंघचालकानंतर सर्वात महत्त्वाचे पद सरकार्यवाहांचे आहे. या पदाची मुदत तीन वर्षे असते. भैयाजी जोशींचा तिसरा कार्यकाल मार्चमध्ये पूर्ण होत आहे. चौथ्या कार्यकालासाठी त्यांचीच पुन्हा निवड करायची की नव्या व्यक्तीला संधी द्यायची याचा विचार भोपाळ येथे सुरू आहे.
संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबोले हे सरकार्यवाह पदासाठी दावेदार आहेत. अन्य सहसरकार्यवाहांपैकी सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, व्ही. भागैया यांची नावेही चर्चेत आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे दोन वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर सुरेश सोनी अलीकडेच संघात पुन्हा सक्रिय झाले आहेत.
पुन्हा भैयाजी जोशी की नवी व्यक्ती?-
संघाच्या निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधी सभेची भूमिका महत्त्वाची असते. सरकार्यवाहांची निवड प्रतिनिधी सभेच्या ४0 ते ४५ सदस्यांद्वारे केली जाते. तथापि आजवरचे सर्व सरकार्यवाह एकमताने निवडले गेले आहेत. या पदासाठी कधीही निवडणूक झाली नाही. ही परंपरा पाहता चौथ्या कार्यकालासाठी भैयाजींची पुन्हा निवड करायची की नव्या कोणाला संधी द्यायची याचा निर्णयही एकमतानेच होईल, असे समजते.