कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 05:22 PM2019-08-06T17:22:45+5:302019-08-06T17:23:18+5:30
कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, सध्या लोकसभेमध्ये रणकंदन सुरू आहे.
नवी दिल्ली - कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, सध्या लोकसभेमध्ये रणकंदन सुरू आहे. दरम्यान, फारुख अब्दुल्लांना नजरकैदेत ठेवण्याच्या वृत्तामुळे लोकसभेतील वातावणर तापले. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचना विधेयकावर चर्चा सुरू असताना फारुख अब्दुल्ला यांच्या अनुपस्थितीचा विषय उपस्थित झाला. यावेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही, तसेच त्यांना अटकही करण्यात आलेली नाही, असे ते त्यांच्या घरी सुखरूप आहेत असा दावा केला. मात्र फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप केला.
मंगळवारी लोकसभेचे कामकाज सुरू असताना एनसीपीच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी फारुख अब्दुल्लांच्या अनुपस्थितीचा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना अमित शहा यांनी सांगितले की, ''फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही, तसेच त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.'' मात्र मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. गृहमंत्री अशाप्रकारे खोटे बोलत आहेत, याचे दु:ख मला वाटते, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला.
दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. भारताने काश्मीरला दगा दिला असून, कलम ३७० हटवणे हे लोकशाही विरोधी असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ''असा भारत आम्हाला अपेक्षित नव्हता. आम्हाला सेक्युलर भारत अपेक्षित होता. कलम ३७० बाबत आज भारताने काश्मीरला दगा दिला आहे. कलम ३७० हटवणे ही लोकशाहीविरोधी कृती आहे. या विरोधात आम्ही न्यायायालयात धाव घेऊ,'' असे फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.