सीबीआय प्रमुखपदी कोणाची होणार नियुक्ती? विचारात घेण्यासाठी १२ पेक्षा जास्त नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 02:50 AM2021-01-19T02:50:57+5:302021-01-19T06:58:43+5:30
सीमा सुरक्षा दल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक राकेश अस्थाना आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी ही या महत्वाच्या पदासाठी आघाडीवरील नावे आहेत. अस्थाना व मोदी यांनी सीबीआयमध्ये काम केले होते.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) प्रमुख आर. के. शुक्ला हे एक फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असल्यामुळे सीबीआयचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची जोरदार चर्चा येथे आहे. सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीतील कार्मिक विभागाने देशातून एक डझनपेक्षा जास्त भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी या पदासाठी बनवली आहे.
सीमा सुरक्षा दल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक राकेश अस्थाना आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी ही या महत्वाच्या पदासाठी आघाडीवरील नावे आहेत. अस्थाना व मोदी यांनी सीबीआयमध्ये काम केले होते. अस्थाना हे १९८४ च्या आयपीएसचे गुजरात केडर तुकडीचे तर मोदी हे आसाम-मेघालय केडरचे आहेत.
निवड कोण करते?
सीबीआयच्या प्रमुखाची निवड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख असलेली तीन सदस्यांची उच्चाधिकार समिती करते. समितीत सरन्यायाधीश (एस. ए. बोबडे) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते (अधिर रंजन चौधरी) आहेत. अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील अभूतपूर्व वादांमुळे सीबीआय नकारात्मक चर्चेत होती व त्या पार्श्वभूमीवर २०१९ मध्ये आर. के. शुक्ला यांची निवड चकीत करणारी होती. आर. के. शुक्ला यांना छोटी मुदतवाढ मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.