"दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील...", आपचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:49 IST2025-02-17T17:40:00+5:302025-02-17T17:49:35+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

"दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील...", आपचा दावा
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. बरेच दिवस उलटूनही अजून दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झाली नाही. यावरून आम आदमी पक्षाने(आप) भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीनंतर आपने भाजपवर निशाणा साधला. १० दिवस उलटून गेले, दिल्लीत नवीन सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मागील भाजप सरकारप्रमाणेच पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील आणि दिल्लीत अस्थिर सरकार स्थापन होईल. त्यामुळे आप एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावेल आणि निवडणुकीत भाजपद्वारे देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यास भाग पाडेल, असे आपने म्हटले आहे.
माजी मंत्री आणि आपचे नेते गोपाल राय यांनी बैठकीत सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील जनतेने आपला ४३ टक्के आणि भाजपला ४५.६ टक्के मते दिली. दिल्लीत भाजपने उघडपणे निवडणूक आयोगाचे उल्लंघन केले, त्यामुळे भाजपला आप पेक्षा २ टक्के जास्त मते मिळाली. तरीही दिल्लीतील जनतेने केजरीवाल आणि आपवरील दबाव नाकारला आणि ४३ टक्के मतदारांनी ते केजरीवालांसोबत असल्याचे दाखवून दिले. ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.
पुढे गोपाल राय म्हणाले, १० दिवस उलटून गेले आहेत आणि भाजप दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल? हे ठरवू शकत नाही. त्यांच्याकडे कालही मुख्यमंत्री नव्हता आणि आजही नाही. पंतप्रधान परदेशातून परतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपने म्हटले. परंतु आता एकामागून एक तारखा दिल्या जात आहेत. यावरून असे दिसून येते की, जेव्हा पहिल्यांदा सत्ता बदलली होती, तेव्हा ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले होते.
दिल्लीला पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलताना दिसत आहेत. दिल्लीत अस्थिर सरकार राहील. अशा परिस्थितीत आपला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आप सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. तसेच, आज आम्ही संघटनेची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गोपाल राय यांनी सांगितले.
नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २० फेब्रुवारीला
दरम्यान, भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. आज होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मोठा शपथविधी समारंभ होईल. शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.