कोण होणार भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मंत्री? कोणाला आला शपथविधीसाठी कॉल? पाहा लिस्ट...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:11 AM2021-09-16T11:11:01+5:302021-09-16T11:14:55+5:30
Bhupendra Patel Cabinet : गुजरातमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे, याआधीच आमदारांना फोन कॉल सुरू झाले आहेत.
अहमदाबाद : पुढील वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने (भाजप) आपले संपूर्ण सरकार बदलले आहे. विजय रुपाणी यांना हटवल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि आता संपूर्ण मंत्रिमंडळात बदल करण्याची तयारी आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी दीड वाजता होणार आहे.
गुजरातमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे, याआधीच आमदारांना फोन कॉल सुरू झाले आहेत. ज्या आमदारांकडे फोन पोहोचत आहेत, ते मंत्री होण्याचे प्रबळ दावेदार आहेत. आतापर्यंत कोणापर्यंत फोन पोहोचला आहे आणि कोण मंत्री बनू शकतात? ते पाहूया...
1. मोरबीचे आमदार बृजेश मेरजा
2. राजकोट पूर्वचे आमदार अरविंद रयानी
3. लिमडीचे आमदार किरीट सिंह राणा
4. गणदेवीचे आमदार नरेश पटेल
5. सुरत माजुराचे आमदार हर्ष सांघवी
6. विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल
7. ओलपाडचे आमदार मुकेश पटेल
8. बडोदा शहराचे आमदार मनीषा वाकील
दरम्यान, गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल सरकारच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी मानापमान नाट्य रंगले. नाराज आमदार माजी मुख्यमंत्री रुपानी यांच्या निवासस्थानी पोहोचले. काल दिवसभराच्या या घटनाक्रमानंतर अखेर गुरुवारी नव्या मंत्र्यांनी शपथ घेण्याचे निश्चित करण्यात आले.
मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा होती. यावरुन मतभेद झाले. भूपेंद्र पटेल हे बहुतांश मंत्र्यांमध्ये बदल करु इच्छित होते. २१ ते २२ मंत्र्यांना बुधवारी शपथ देण्यात येणार होती. मात्र, हा कार्यक्रम टाळण्यात आला. आता नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी दीड वाजता होणार आहे.