कोण होणार राष्ट्रपती?
By admin | Published: June 1, 2017 01:18 AM2017-06-01T01:18:20+5:302017-06-01T01:18:20+5:30
रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी
सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी आणि विरोधक आपापले बळ अजमावण्यासाठी मतदान घडवणार? याबाबत स्थिती अद्याप स्पष्ट नाही. भारताचे १४ वे राष्ट्रपती ऐंशीच्या दशकानंतर प्रथमच अशा स्थितीत निवडले जाणार आहेत की एकूण मतदानाच्या ४0 टक्के हमखास मते सत्ताधारी एनडीएकडे आहेत. साहजिकच राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार विराजमान करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि एनडीए विजयाच्या निकट आहेत.
मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे ३३८ खासदार व १३५२ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांच्या मतमूल्याची बेरीज आजमितीला ५ लाख ३२ हजार 0३६ आहे. तरीही बहुमतासाठी सत्ताधारी आघाडीला आणखी १७ हजार ४0४ मतांची आवश्यकता आहेच.
एनडीएच्या साऱ्या मतदारांना एकत्र ठेवून आणखी एकदोन गैर काँग्रेस पक्षांना आपल्याकडे ओढण्यात मोदी यशस्वी ठरले तर राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांना फारसा त्रास होणार नाही. तथापि एनडीएतील शिवसेना, अकाली दल, तेलुगु देशम यासारख्या पक्षांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली तर सध्याच्या गणितात बराच फरक पडू शकतो.
आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील टीआरएस, दिल्लीतील आप, तामिळनाडूतील अद्रमुक व ओडिशात बीजेडी हे पक्ष आजमितीला एनडीए अथवा यूपीए यापैकी कोणत्याही आघाडीचे घटक पक्ष नाहीत.
या ६ पक्षांकडे १४ टक्के मते आहेत. यापैकी एक-दोन पक्षांची मते वळवण्यात जरी मोदींना यश आले, तर पारडे एनडीए उमेदवाराच्या दिशेने झुकू शकते. याउलट विपरित स्थितीत विरोधकांना जर चमकदार कामगिरी करून दाखवण्यासाठी सर्व गैरभाजप मतदारांना एकत्र ठेवून त्यांची मते आपल्या उमेदवाराच्या पारड्यात त्यांना सर्वशक्तिनिशी ओढावी
लागतील.
ही शक्यता अर्थातच फार धूसर आहे, याचे कारण अद्रमुक व वायएसआर काँग्रेसने एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.
... तर सर्वसंमतीने होऊ शकते निवड
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण यावरही हा खेळ बऱ्यापैकी अवलंबून आहे. एखादे असे नाव अचानक पुढे आले तर दोन्ही आघाड्यातील अंतर्विरोधही स्पष्टपणे सामोरे येतील आणि सारी समीकरणेही बदलू शकतील.
ज्या नावाला विरोध करणे बहुतांश विरोधकांना अशक्य होईल, असे नाव पुढे करण्यात जर एनडीएने पुढाकार घेतला तर सर्वसंमतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडू शकते. वाजपेयींच्या काळात असे घडले आहे.
डॉ. अब्दुल कलाम यांची निवड बिनविरोध झाली नसली तरी डावे पक्ष वगळता, देशातील सर्व राजकीय पक्षांनी कलाम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत ७७६ खासदार व सर्व राज्यांतील मिळून ४१२0 आमदार मतदान करणार आहेत.
आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य १0,९८,८८२ इतके आहे.
देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४७४ इतकी आहे. तर ७७६ खासदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४0८ आहे.
राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान ५ लाख ४९ हजार ४४१ मतांची आवश्यकता आहे.