'जन सुराज' दल स्थापन झाल्यास कोण असेल अध्यक्ष? प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 07:30 PM2024-07-28T19:30:19+5:302024-07-28T19:33:32+5:30
Prashant Kishor : रविवारी (२८ जुलै) प्रशांत किशोर यांनी पाटणा येथील बापू सभागृहात एका कार्यशाळेला संबोधित केले.
पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथील पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंतीदिनी अधिकृतपणे जनसुराज या राजकीय दलाची स्थापना करणार आहेत. यासाठी त्यांनी मोठी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (२८ जुलै) प्रशांत किशोर यांनी पाटणा येथील बापू सभागृहात एका कार्यशाळेला संबोधित केले. यामध्ये सर्व जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी सहभागी झाले होते.
यादरम्यान त्यांच्या पक्षाचे नेतृत्व कोणाच्या हाती असेल, सुद्धा खुद्द प्रशांत किशोर यांनी सांगितले. "जर जनसुराज दलाची स्थापना झाली तर ती जनरल, ओबीसी आणि मुस्लीम अशाप्रकारे पाच वर्गांमध्ये विभागली जाईल. दलाच्या नेतृत्वावर सखोल चर्चा झाली आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की, प्रत्येक वेळी पाच वर्गांपैकी एका वर्गाला दलाचं नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल, असं ठरलं आहे. दलाचा नेता कोण किंवा कोणत्या वर्गातून होणार? तर या पाच वर्गांना पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी द्यायची, असा निर्णय सर्वांनी घेतला आहे", असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.
याचबरोबर, "दोन प्रश्न आहेत, पहिली संधी कोणाला मिळेल? किती दिवसांसाठी मिळेल? तर किती दिवसांसाठी मिळेल, हे तुम्ही ठरवा. एक सूचना अशी आहे की, जो दलाचं नेतृत्व करेल, त्याला एक वर्षाची संधी मिळावी. कारण, पाच वर्षात पाचही प्रवर्गातील लोकांना प्रत्येकी एक वर्ष दलाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. दुसरी सूचना म्हणजे दोन वर्षांची संधी द्या, कारण एका वर्षात फारसे काम होणार नाही, पण एक वर्षाच्या बाजूनं असलेल्यांचं म्हणणं आहे की, पाच वर्षांत समाजातील सर्व घटकांना काम करण्याची संधी मिळेल", असं प्रशांत किशोर म्हणाले.
पुढे प्रशांत किशोर म्हणाले, "दोन वर्षांच्या मर्जीत असलेल्यांची अडचण अशी आहे की, दलित समाजाचा अध्यक्ष झाला की त्याला आठ वर्षांनीच दुसरी संधी मिळेल." या कार्यशाळेला आलेल्या जनसुराजच्या पदाधिकाऱ्यांना प्रशांत किशोर यांनी विचारलं की, आता सांगा पक्षाध्यक्षाची मुदत एक वर्षाची असावी की दोन वर्षांची? यावर सर्वांनी एक वर्ष असं सांगितलं. दरम्यान, पक्ष स्थापनेच्या तयारीसाठी संपूर्ण बिहारमध्ये प्रचाराशी संबंधित दीड लाखाहून अधिक पदाधिकाऱ्यांसह एकूण ८ वेगवेगळ्या राज्यस्तरीय बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये पक्षबांधणीची प्रक्रिया, त्याचं नेतृत्व, घटना आणि पक्षाचं प्राधान्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांसोबत ठरवलं जाणार आहे.