फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 06:24 AM2024-05-05T06:24:49+5:302024-05-05T06:24:57+5:30
- प्रसाद आर्वीकर लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : फोडाफोडीच्या राजकारणाने विरोधकांनी जेरीस आणलेल्या काँग्रेसने अखेर शनिवारी चार उमेदवारांची घोषणा ...
- प्रसाद आर्वीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : फोडाफोडीच्या राजकारणाने विरोधकांनी जेरीस आणलेल्या काँग्रेसने अखेर शनिवारी चार उमेदवारांची घोषणा करीत नवा डाव टाकला आणि विरोधकांवर अप्रत्यक्ष घाव केले आहेत. या खेळीने भाजपसह ‘आप’चे टेन्शन वाढले आहे.
विद्यमान खासदारांसह प्रबळ दावेदार असणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देत निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला खिळखिळे करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच उमेदवारी यादी जाहीर करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अगदी सावध भूमिका घेतली. दुसऱ्या यादीत काँग्रेसने लुधियानामधून प्रदेशाध्यक्ष अमरदीपसिंग राजा वडिंग, आनंदपूर साहीब मतदारसंघातून माजी खासदार विजय इंदर सिंगला, गुरुदासपूर मतदारसंघातून काँग्रेसचे महासचिव सुखजिंदरसिंग रंधावा आणि खुड्डूरसाहिब मतदारसंघातून माजी आमदार कुलबीरसिंग जिरा यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेने भाजपसह ‘आप’ची धडधड वाढली आहे.
आनंदपूरसाहिब येथून काँग्रेसने विजय इंदर सिंगला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत आपचे प्रवक्ता मलविंदर सिंग कांग, अकाली दलाचे माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा यांच्याशी होईल. या मतदारसंघात भाजपने अजून उमेदवार घोषित केला नाही.
उमेदवार देताना काॅंग्रेसने केले अनेक फेरबदल
काँग्रेसने उमेदवारी देताना फेरबदल केले आहेत. आनंदपूरसाहिब येथे विद्यमान खासदार मनीष तिवारी यांच्या जागी विजय इंदर सिंगला यांना, तर मनीष तिवारी यांना चंडीगडमधून तिकीट दिले आहे, तर खुड्डूरसाहिबमध्येही विद्यमान खासदार जसबीरसिंग गिल यांचे तिकीट कापले आहे.
लुधियानात स्वकीयांशीच सामना
लुधियाना मतदारसंघातील लढत सर्वांचेच लक्ष वेधणारी ठरत आहे. तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे अमरिंदरसिंग राजा वडिंग यांची लढत भाजपचे उमेदवार खासदार रवनीतसिंग बिट्टू यांच्याशी होत आहे.
बिट्टू हे या मतदारसंघाचे दोन टर्म काँग्रेसकडून खासदार राहिलेले आहेत. मार्च महिन्यातच त्यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात स्वकीयांसोबत लढताना काँग्रेसचा कस लागणार आहे.
काँग्रेसचे उपमुख्यमंत्री लोकसभेच्या रिंगणात
nकाँग्रेसचे रंधावा यांची लढत गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिनेश बब्बू, अकाली दलाचे दलजितसिंग चिमा आणि आपचे अमंशेर सिंग शेरी कलसी यांच्यासोबत आहे.
nकाँग्रेसचे रंधावा हे चरणजित चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. चार वेळा आमदार राहिलेले रंधावा राजस्थान काँग्रेसचे प्रभारीही आहेत.
काँग्रेसपुढे भाजप, आपचे आव्हान
खुड्डूरसाहिब मतदारसंघात काँग्रेसचे जिरा यांची लढत आपचे लालजितसिंग भुल्लर, भाजपचे मनजितसिंग मन्ना मियांविंड, अकाली दलाचे वीरसासिंग वल्टोहा आणि अपक्ष अमृतपाल सिंग यांच्याशी होईल.