Amit Shah: २०२४ मध्ये विरोधकांचा PMपदाचा चेहरा कोण असेल? अमित शाहांनी थेट नावच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 05:39 PM2022-09-24T17:39:24+5:302022-09-24T17:40:01+5:30
Amit Shah: भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कोण आव्हान देईल, याबाबत मोठं विधान केलं आहे.
पाटणा - २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक आता अवघ्या दीड वर्षावर आली आहे. गेल्या सव्वाआठ वर्षांपासून देशाच्या सत्तेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच २०२४ मध्ये मोदींसमोर पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून विरोधी पक्षातील अनेक नावं समोर येत आहेत. मात्र भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कोण आव्हान देईल, याबाबत मोठं विधान केलं आहे.
काल बिहारच्या दौऱ्यावर असताना अमित शाह यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा अमित शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, नीतीश कुमार आणि लालू प्रसाद यादव बिहारची दिशाभूल करत आहेत. नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का याबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, नितीश कुमार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये कुठेही नाहीत. नितीश कुमार हे कुठूनही लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत. जर विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा कुणी चेहरा आणि उमेदवार असेल तर तो राहुल गांधी असतील.
यावेळी नितीश कुमार हे भाजपासोबत येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, नितीश कुमार यांच्यासाठी भाजपासोबत येण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत. नितीश कुमार यांनी स्वत: भाजपाची साथ सोडली आहे. आता माघारी परतण्यासाठी काय उरलं आहे. मागच्यावेळी जेव्हा आरजेडीची साथ सोडून आले होते तेव्हा ती गोष्ट आम्ही समजून घेतली होती. मात्र आता आम्हाला सोडून जाणे समजून घेता येत नाही आहे.