इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 05:39 PM2024-05-25T17:39:57+5:302024-05-25T18:37:25+5:30
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील कप्तानगंज विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कविंद्र चौधरी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केले आहे.
देशात लोकसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहेत. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, उत्तर प्रदेशातील कप्तानगंज विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कविंद्र चौधरी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केले आहे.
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत सपा आमदार कविंद्र चौधरी म्हणाले की, अखिलेश यादव हे यासाठी सर्वात योग्य चेहरा आहेत. कारण त्यांनी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतले आहे आणि त्यांना सरकार चालवण्याचा खूप अनुभव आहे. तसेच, ही निवडणूक केवळ विकास आणि खोटे कायदे आणि गुंडगिरीच्या मुद्द्यावर होत आहे, ही निवडणूक संविधान आणि लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना इंडिया आघाडीला सत्तेत आणायचे आहे, असे कविंद्र चौधरी म्हणाले.
प्रत्येक धर्म आणि जातीचे लोक भाजपावर नाराज आहेत. अनेक ठिकाणी भाजपाचे लोक मतदारांना आमिष दाखवत आहेत आणि मारहाणही करत आहेत, ज्याबद्दल आम्ही सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करत आहोत, असा आरोप सपा आमदार कविंद्र चौधरी यांनी केला आहे. याचबरोबर, पुढे सपाचे आमदार कविंद्र चौधरी म्हणाले की, एकीकडे संविधान वाचवणारे लोक आहेत तर दुसरीकडे संविधान नष्ट करू पाहणारे लोक आहेत.