कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 05:44 PM2024-10-15T17:44:48+5:302024-10-15T17:49:08+5:30
आज केंद्रात सरकार चालवताना भाजपाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीची गरज भासत आहे.
नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी नवीन चेहरा येणार अशी चर्चा आहे. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी पक्षाचं नेतृत्व कुणाला देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंगळवारी भाजपाच्या केंद्रीय पातळीवर अध्यक्षपदाच्या निवडीसाठी समिती बनवण्यात आली. या समितीत डॉ. के लक्ष्मण यांना राष्ट्रीय निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहे तर नरेश बंसल, रेखा वर्मा आणि संबित पात्रा यांना सहनिवडणूक अधिकारी बनवलं आहे.
ही समिती निवडणुकीचा कार्यक्रम ठरवेल. पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल त्यासाठी २ महिने कालावधी लागेल. ही समिती आधी राज्य संघटनेतील निवडणूक घेतील त्यानंतर मंडल, जिल्हा, राज्याचे अध्यक्ष निवडतील. १५ ऑक्टोबर २०२४ ला संघटनात्म निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. बूथ, विभाग, जिल्हा आणि राज्य स्तरावरील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखा अनुक्रमे जाहीर केल्या जातील. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारणीच्या निवडणुका होतील. राज्य कार्यकारिणीनंतर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. राज्य कार्यकारणीचे सदस्य राज्यांच्या अध्यक्षांची निवड करतील. नंतर राष्ट्रीय कार्यकारणीतील लोक राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करतील.
भारतीय जनता पार्टी की राष्ट्रीय कार्यकारिणी के निर्णय के अनुसार पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री @JPNadda जी ने संगठन चुनाव के संचालन हेतु राष्ट्रीय चुनाव अधिकारी एवं सह-चुनाव अधिकारियों की नियुक्ति की घोषणा की है। pic.twitter.com/uOSdzJ90Ia
— Sanjay Mayukh (@drsanjaymayukh) October 15, 2024
एकीकडे महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीसह देशात ५० ठिकाणी पोटनिवडणुका आहेत. त्यात भाजपात पक्षांतर्गत निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्ल्यानुसार भाजपानं ही पाऊले उचलली आहे. लोकसभा निवडणुकीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी फारसा रस घेतला नाही. भाजपा नेतृत्वानेही संघाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लोकसभा निकालात भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या. केंद्रात भाजपा सरकारऐवजी एनडीए सरकार आणावं लागले. आज भाजपाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीची गरज भासत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना आता भाजपाला कुणाची गरज नाही, पक्ष आत्मनिर्भर आहे असं आरएसएसबाबत म्हटलं होते, त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. लोकसभा निकालानंतर भाजपा आणि आरएसएस यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. संघानेही भाजपाच्या प्रचारात सक्रीय भूमिका घेतली, त्यामुळे हरयाणात भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्तेत आली. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे.