चंद्रावर आधी कोण उतरणार, रशिया की भारत? लागली शर्यत; लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:28 AM2023-08-17T05:28:47+5:302023-08-17T05:31:03+5:30
नेमके अगोदर कोण चंद्रावर पोहोचणार याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे.
बंगळुरू : इस्रोने भारताचे चंद्रयान-३ आणि रशियाचे लुना-२५ पुढील आठवड्यात चंद्रावर उतरण्याच्या तयारीत असून, दक्षिण ध्रुवावर अगोदर पोहोचण्यासाठी दोन्ही देशांत जोरदार स्पर्धा लागली आहे. दोघांच्या लँडिंगच्या तारखा, लुना-२५ साठी २१ ते २३ ऑगस्ट आणि २३-२४ ऑगस्ट अशा जवळ असून, नेमके अगोदर कोण चंद्रावर पोहोचणार याची संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे.
‘चांद्रयान-३’ चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचण्यास लागले २२ दिवस
चांद्रयानासाठी १७ ऑगस्ट खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी इस्रो ‘चांद्रयान-३’चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे करेल व २३ ऑगस्ट रोजी लँडिंग होईल. चांद्रयानमध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. लँडर व रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि १४ दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या किरणोत्साराचा अभ्यास करेल. लँडर व रोव्हर चंद्रावर पाण्याचा शोध घेतील.
१०० किमी कक्षेत लुना-२५ मॉस्को : रशियाचे लुना-२५ हे यान चंद्राच्या १०० किमीच्या कक्षेत पोहचण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. रशियाने ४७ वर्षांनंतर चंद्रावर आपली मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचल्या आहेत. चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन बर्फाचे अस्तित्व शोधणे, दक्षिण ध्रुवावरील मातीच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास ही या मोहिमेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
लँडिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग ३० किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत आणण्याची प्रक्रिया आणि यान आडव्या स्थितीपासून उभ्या स्थितीकडे नेण्याची प्रक्रिया आहे. यातच क्षमता सिद्ध करायची आहे. - एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो.