आमचे कोण ऐकणार? कर्नाटकच्या मुख्य प्रतोदांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:23 AM2021-06-09T05:23:24+5:302021-06-09T05:23:57+5:30
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना हटविण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर भाजप आमदार कुमार यांनी नुकत्याच घडलेल्या घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली आहे.
बंगळुरू : भाजप पक्षनेतृत्वाने आमदारांचे व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कर्नाटक विधानसभेतील सरकारचे मुख्य प्रतोद व्ही. सुनीलकुमार यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना हटविण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर भाजप आमदार कुमार यांनी नुकत्याच घडलेल्या घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागील तीन दिवसांत माध्यमांत येत असलेल्या टिप्पणी पक्षाच्या हिताच्या नाहीत. काही लोकांची टिप्पणी सर्व आमदार व पक्ष कार्यकर्त्यांच्या सारख्या नाहीत.
आम्ही आमची मते माध्यमांना सांगू शकत नाहीत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला आमचे सांगणे आहे की, आमचे म्हणणे ऐकण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. त्यांनी याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये भाजपचे कर्नाटक प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, अन्य राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी व कर्नाटक भाजप अध्यक्ष नलीनकुमार कतील यांना टॅग केले आहे.
अन्य एक भाजप आमदारानेही अशाच प्रकारचे विचार मांडले आहेत. त्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर म्हटले आहे की, काही आमदारांनी सार्वजनिक वक्तव्ये देण्यासह पक्षातील घटनाक्रम पक्षासाठी योग्य नाही. पक्ष व सरकारबाबत आमच्यापैकी प्रत्येकाचे आपापले विचार आहेत.
प्रत्येक जण माध्यमांसमोर आपली मनातली गोष्ट सांगू शकत नाही. कारण आम्ही पक्षाची शिस्त पाळणारे आहोत. आमदार व पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपली मते मांडावी, असे एखादे उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. तेथे वरिष्ठ नेत्यांनी विविध विचार ऐकले पाहिजेत व विचारांचे आदानप्रदान झाले पाहिजे.
५० आमदारांच्या अशाच भावना
आम्ही पक्ष व सरकारच्या कामकाजाबाबत आपल्या चिंता वरिष्ठांच्या कानावर घालू इच्छित आहोत. हे मुद्दे नेतृत्वाबाबत नाहीत, हेही स्पष्ट आहे. सुमारे ५० पेक्षा अधिक आमदारांच्या अशाच भावना आहेत, असे कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने म्हटले आहे.