गौतम गंभीरच्या जागी कोण? पूर्व दिल्लीमध्ये भाजपाकडून या नेत्यांची नावं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 01:13 PM2024-03-02T13:13:45+5:302024-03-02T13:14:19+5:30
Loksabha Election 2024: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याने यावेळी लोकसभेची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याने यावेळी लोकसभेची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. गौतम गंभीरने याबाबत सोशल मीडियावरून माहिती देताना ‘’मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मला सर्व राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती केली’’, असे सांगितले. जनसेवेची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असेही गंभीर म्हणाला. मात्र आता मी क्रिकेटशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडू इच्छितो, असेही त्याने सांगितले. त्यामुळे आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी भाजपाकडून गौतम गंभीरला तिकीट मिळणार नाही, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. या दरम्यान गौतम गंभीरने ट्विट करून राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केल्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांनुसार पूर्व दिल्लीमधून यावेळी भाजपाकडून हर्ष मल्होत्रा, कुलजीत सिंह चहल आणि अक्षय कुमार यांची नावं चर्चेत आहेत. तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यानंतर या जागेवरून कुलदीप कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्या यादीमध्ये १०० नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच त्यामध्ये दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे पूर्व दिल्लीमधून भाजपाचा उमेदवार कोण असेल, हे आजच स्पष्ट होणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर याने ६ लाख ९६ हजार १५८ मतं घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्याने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली आणि आम आदमी पक्षाच्या आतिषी मार्लेना यांचा पराभव केला होता.