भाजपाला लवकरच सारा देश नाकारेल - चंद्राबाबू नायडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:41 AM2018-04-07T01:41:08+5:302018-04-07T01:41:08+5:30
आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.
नवी दिल्ली/ अमरावती - आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.
नायडू यांनी टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्षाच्या खासदारांशी शुक्रवारी संवाद साधला. ते म्हणाले की, संसदेत कामकाज वारंवार तहकूब करून, भाजपा व मोदी सरकारने आंध्र प्रदेशच्या प्रश्नापासून पळ काढला. भाजपा या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करीत आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आणि राज्यसभेत सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होईपर्यंत आपल्याला लढावे लागणार आहे.
तेलगू देसमच्या खासदारांनी राज्यसभेमध्ये गुरुवारी निदर्शने केली, त्या वेळी वायएसआर काँग्रेसचे खासदार त्यात सहभागी झाले नाहीत. पूर्वी ब्रिटिशांबरोबर काही एतद्देशीय लोक हातमिळवणी करायचे, तसेच सध्या भाजपा व वायएसआर काँग्रेसचे नाते आहे, असा आरोप त्यांनी केला.
आंध्रला विशेष दर्जा मिळावा, या मागणीसाठी तेलगू देसमच्या नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राजधानी अमरावतीमध्ये सायकल मोर्चा काढला. या सहा किलोमीटरच्या सायकल मोर्चात स्वत: नायडू हेही सायकल चालविताना दिसत होते.
काँग्रेसचा हक्कभंग ठराव
सोनिया व राहुल गांधी यांच्यामुळे लोकसभेत वारंवार गदारोळ होत असून त्यामुळे लोकसभेचे कामकाज पार पाडणे अशक्य झाले आहे असे विधान करून, सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी हक्कभंग ठराव आणला आहे. बँकिंग घोटाळा तसेच अविश्वास ठराव अशा अनेक मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांची इच्छा होती. पण केंद्र सरकारलाच ते नको आहे, असे ते म्हणाले.
वायएसआर काँग्रेसच्या खासदारांचेही राजीनामा
आंध्र प्रदेशला केंद्राने विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसच्या लोकसभेतील पाच सदस्यांनी शुक्रवारी आपले राजीनामे लोकसभाध्यक्षांकडे सुपूर्द केले. त्या पक्षाचे आता राज्यसभेत विजयसाई रेड्डी हे एकमेव खासदार आहेत. त्यांनी मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही.