मोह मायेचा त्याग करून कुटुंबाकडून ३० कोटींची संपत्ती दान; ६ जणांनी स्वीकारली जैन धर्माची दिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 08:59 AM2022-01-29T08:59:31+5:302022-01-29T09:00:42+5:30
एकाच कुटुंबातील ६ जणांनी दिक्षा घेण्याची पहिलीच वेळ
रायपूर: छत्तीसगढमधील राजनांदगाव शहरात वास्तव्यास असलेल्या डाकलिया कुटुंबानं संन्यास घेतला. कुटुंबाकडे असलेली ३० कोटींची संपत्ती दान करून त्यानं विधिवत जैन साधू साध्वी म्हणून दिक्षा घेतली. डाकलिया कुटुंबातील पती, पत्नी, त्यांची दोन मुलं आणि दोन मुलींनी दिक्षा घेतली.
शहरातील जैन बागेत दिक्षा समारंभ संपन्न झाला. श्री जिनपीयूष सागर सुरीश्वरजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. एकाच कुटुंबातील सर्वच्या सर्व ६ सदस्यांनी साधू साध्वी म्हणून दिक्षा घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे जैन समाजासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला.
भूपेंद्र डाकलिया, त्यांच्या पत्नी सपना डाकलिया, मुलगा देवेंद्र डाकलिया, हर्षित डाकलिया, मुलगी महिमा आणि मुक्ता डाकलिया यांनी जैन धर्माची दिक्षा घेतली. त्यांच्या सोबत संगीता गोलछा, सुशिला लुनिया यांनीदेखील दिक्षा घेतली. यावेळी जिल्ह्यातील जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डाकलिया परिवारानं विधिवत दिक्षा घेतली.
आचार्य पीयूष सागर महाराज यांच्या उपस्थितीत सहा जणांनी जैन साधू-साध्वी म्हणून दिक्षा घेतली. या सोहळ्यासाठी जैन समाजाकडून मोठी तयारी करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी राज्यासह देशभरातील श्रद्धाळू पोहोचले होते. दिक्षा घेण्याआधी डाकलिया कुटुंबानं आपली संपूर्ण संपत्ती दान केली. संसारातील मोह माया त्यागून दिक्षा घेण्याची प्रेरणा आपल्याला पूज्य आचार्य भगवान श्री पीयूष सागर महाराज यांच्याकडून मिळाल्याचं कुटुंबाचे प्रमुख असलेल्या भूपेंद्र डाकलिया यांनी सांगितलं.