सातव्या महिन्यात घाऊक महागाई शून्याखाली; भविष्यात महागाई वाढण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 08:33 AM2023-11-15T08:33:24+5:302023-11-15T08:45:41+5:30
ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थाची महागाई २.५३ टक्के राहिली.
नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे ०.५२ टक्के राहिला. सलग सातव्या महिन्यात घाऊक महागाई शून्याच्या खाली आला आहे. भाजीपाल्याच्या किमतीतील चढ-उतार, बहुतांश खाद्यपदार्थांच्या देशांतर्गत किमतीत झालेली वाढ तसेच प्रतिकूल आधारभूत परिणामांमुळे घाऊक महागाई नजीकच्या भविष्यात वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
घाऊक किंमत निर्देशांक डब्ल्यूपीआय) आधारित महागाई ( एप्रिलपासून सतत शून्याच्या खाली आहे. सप्टेंबरमध्ये तो उणे ०.२६ टक्के होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये तो ८.६७ टक्के होता. याबाबत मंगळवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले की, 'ऑक्टोबर २०२३ मध्ये महागाईचा दर शून्याखाली राहिला. गेल्यावर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत रसायने आणि रासायनिक उत्पादने, वीज, कापड, मूलभूत धातू, खाद्यपदार्थ, कागद आणि कागदाची उत्पादने इत्यादींच्या किमतीत घसरण हे त्याचे प्रमुख कारण होते.
ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थाची महागाई २.५३ टक्के राहिली. भाजीपाला आणि बटाट्याचा भाव अनुक्रमे उणे २१.०४ टक्के आणि उणे २९.२७ टक्के राहिला. कांद्याचा वार्षिक दर ६२.६० टक्क्यांच्या उच्च पातळीवर राहिला. कडधान्ये आणि धानाची भाववाढ अनुक्रमे १९.४३ टक्के आणि ९.३९ टक्के राहिली. आयसीआरए लिमिटेडच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की वार्षिक आधारावर, सप्टेंबर २०२३ मधील ०.३ टक्क्यांवरून ऑक्टोबर २०२३ मध्ये डिफ्लेशन किंचित वाढून ०.५ टक्के झाले.