बंगालमध्ये डाव्यांची आक्रमकता बिघडविणार कुणाचे गणित? TMC विरुद्ध भाजप अशी लढत

By योगेश पांडे | Published: May 31, 2024 01:32 PM2024-05-31T13:32:20+5:302024-05-31T13:32:51+5:30

शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी पश्चिम बंगालमधील नऊ जागांवर मतदान होणार आहे. यात प्रामुख्याने शहरी भाग असलेले मतदारसंघ आहेत.

Whose calculation will spoil the aggressiveness of the left in Bengal? A fight like TMC vs BJP | बंगालमध्ये डाव्यांची आक्रमकता बिघडविणार कुणाचे गणित? TMC विरुद्ध भाजप अशी लढत

बंगालमध्ये डाव्यांची आक्रमकता बिघडविणार कुणाचे गणित? TMC विरुद्ध भाजप अशी लढत

पश्चिम बंगाल

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोलकाता: हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. अखेरच्या टप्प्यातील नऊ जागांवर तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होताना दिसून येत आहे. मात्र, कधी काळी सत्तेत असलेल्या डावे व काँग्रेसच्या आघाडीकडून काही जागांवर आक्रमकपणे प्रचार करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत हातातील निसटलेली सुशिक्षित मतदारांची मते परत मिळविण्यावर त्यांचा भर असून त्यामुळे नेमके कुणाचे गणित बिघडणार याचे आकलन राजकीय पंडित करत आहेत.

१ जून रोजी पश्चिम बंगालमधील नऊ जागांवर मतदान होणार आहे. यात प्रामुख्याने शहरी भाग असलेले मतदारसंघ आहेत.

सुशिक्षित व तळागाळातील मतदारांची मते मिळवणार

  • २०१९ मध्ये यातील अनेक सुशिक्षित मतदारांनी भाजपला मतदान केले होते. मात्र, यावेळी डाव्यांनी काँग्रेससोबत मिळून तळागाळात जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे.
  • तसेच अखेरच्या टप्प्यातील नऊ मतदारसंघांत डाव्यांनी तरुण व नावाजलेले उमेदवार दिले आहेत. 
  • त्यामुळे सुशिक्षितांसोबतच तळागाळातील मतदारांची मते मिळविण्यावर त्यांचा जोर आहे. 
  • भाजपकडून सीएए तसेच राममंदिरासोबत ममतांच्या सरकारमधील भ्रष्टाचारावर टीका करत प्रचार करण्यात येत आहे.


ममतांसाठी वर्चस्वाची लढाई

बहुतांश मतदारसंघ मुख्यमंत्री व तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या प्रभावातील भागामध्ये येतात. दक्षिण कोलकाता मतदारसंघातून तर ममता स्वत: सरकार चालवितात. २०१९ मध्ये या सर्व नऊ जागांवर तृणमूलने बाजी मारली होती. त्यामुळे या जागा आपल्याकडे कायम ठेवण्याचे ममतांसमोर आव्हान आहे. या नऊ जागांपैकी आठवर भाजपला एकदाही यश मिळालेले नाही.

‘संदेशखाली’सह हायप्रोफाइल लढतींमुळे उत्सुकता

  • अखेरच्या टप्प्यात हायप्रोफाईल लढतींमुळे देशाचे लक्ष लागले आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या टप्प्यात सभा घेतल्या व ममता बॅनर्जी यांनीदेखील त्यांच्या स्टाईलने प्रचार केला.
  • विशेषत: देशात चर्चेचा विषय ठरलेल्या संदेशखालीचा समावेश होणाऱ्या बशीरहाट मतदारसंघात हा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या सामान्य कुटुंबातील रेखा पात्रा यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे.
  • याच टप्प्यात ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बरमधून हॅट्ट्रिकसाठी उभे झाले आहेत, तर उत्तर कोलकाताच्या जागेवर तर तृणमूलचेच विद्यमान खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्यासमोर तृणमूलचेच माजी मंत्री तापस रॉय यांना भाजपने तिकीट दिले आहे.

Web Title: Whose calculation will spoil the aggressiveness of the left in Bengal? A fight like TMC vs BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.