सर्वाधिक इलेक्टोरल बाँड घेणारी फ्युचर गेमिंग कंपनी कोणाची? दक्षिणेतील लॉटरी किंग, नाव ऐकलेले नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 07:45 AM2024-03-15T07:45:49+5:302024-03-15T07:46:16+5:30
future gaming Owner Name: राजकीय पक्षांना निधी देण्याचा हा प्रकार २०१८ मध्ये सुरु झाला होता. पण ज्या कंपन्यांची नावे समोर येत आहेत ती वाचून...
सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर निवडणूक आयोगाकडे भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा डेटा सुपूर्द केला आहे. ही माहिती आयोगाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अशा अशा कंपन्यांची नावे आहेत ज्या फार कोणाला माहिती नाहीत. लोकांना टाटा, रिलायन्स, अदानी यासारख्या कंपन्यांच्या नावांची अपेक्षा होती, परंतु जी नावे समोर आली आहेत त्यापैकी अनेक कंपन्या या अज्ञातच आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बाँड घेणारी फ्युचर गेमिंग कंपनी भारताच्या सर्वात मोठ्या लॉटरी किंगची आहे.
राजकीय पक्षांना निधी देण्याचा हा प्रकार २०१८ मध्ये सुरु झाला होता. एसबीआयने आतापर्यंत २२२१७ बाँड्स विकले आहेत. एसबीआयने १६५१८ कोटी रुपयांच्या बाँड्सची माहिती सार्वजनिक केली आहे. यामध्ये १ लाख, १० लाख आणि १ कोटी रुपयांचे बाँड आहेत.
हे इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्ये फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस ही कंपनी पहिल्या नंबरवर आहे. यानंतर मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा नंबर लागतो. फ्युचरने १३६८ कोटींचे बाँड घेत राजकीय पक्षांना पैसा दिला आहे. तर मेघा इंजिनिअरिंगने ९६६ कोटी रुपये दिले आहेत.
फ्युचर गेमिंग ही कंपनी कोणाची आहे? फ्युचर ग्रुपची नाही. कथितरित्या या गेमिंग कंपनीचा मालक दक्षिण भारतातील लॉटरी किंग सँटियागो मार्टीन आहे. फ्युचरच्या वेबसाईटनुसार मार्टिनने १३ व्या वर्षी लॉटरी व्यवसाय सुरु केला होता. यानंतर त्याने बघताबघता देशभरात लॉटरी खरेदीदार आणि विक्रेत्यांचे एक मोठे नेटवर्क उभे केले. दक्षिणेत ही कंपनी मार्टिन कर्नाटक या नावाने चालते, तर उत्तर-पूर्वेला या कंपनीला मार्टिन सिक्कीम लॉटरी या नावाने ओळखले जाते.
दुसरी मोठी कंपनी मेघा इंजिनिअरिंग ही बंधारे, धरणे आणि वीज निर्मिती प्रकल्प उभारणारी आहे. याचे मालक पीव्ही कृष्णा रेड्डी आणि पीपी रेड्डी आहेत. याचे मुख्यालय हैदराबादमध्ये आहे. या कंपनीचे केंद्र आणि राज्य सरकारसोबत अनेक पीपीपी तत्वावरील प्रकल्प सुरु आहेत. सध्या १८ राज्यांत या कंपनीचे प्रोजेक्ट सुरु आहेत. यामुळे या कंपनीचे राजकीय लागेबांधे खूप मोठे आहेत.