रिजिजू यांच्यानंतर पुढचा नंबर कुणाचा? मोठ्या फेरबदलाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:45 AM2023-05-19T07:45:32+5:302023-05-19T07:46:27+5:30
पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रालयातून हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला सुरुवात केली आहे, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.
पंतप्रधानांनी रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय हिसकावून मोठ्या फेरबदलाचे संकेत दिलेत. डझनभर मंत्री असे आहेत ज्यांच्या कामावर पंतप्रधान समाधानी नाहीत. पीएमओ गेल्या दोन महिन्यांपासून मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करत असून, मूल्यमापनाच्या आधारे फेरबदलाचा निर्णय घेतला जाणार आहे.
मंत्रिमंडळातून कोणाकोणाला डच्चू मिळणार याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती; पण डच्चू मिळेल, हे कोणालाच माहीत नाही. याचे कारण म्हणजे राजकीय अपरिहार्यता. म्हणजे कामगिरी शून्य असली तरी राजकीय अपरिहार्यतेमुळे अनेक नेते मंत्रिपदी राहतील. रालोआला मजबूत करण्यासाठी काही मंत्रिपदे मित्रपक्षांनाही दिली जाणार आहेत. फेरबदलाबाबत मे च्या शेवटच्या आठवड्यात बैठक होणार आहे.
विरोधक म्हणतात...
किरेन रिजिजू हे विधि खात्याचे अपयशी ठरलेले मंत्री होते, अशी टीका काँग्रेससहित अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी सांगितले की, विधि खाते हाताळण्यात अपयशी ठरलेल्या रिजिजू यांना तेथून हटवून पृथ्वी विज्ञान खाते देण्यात आले आहे. या खात्यात ते काय करणार हा प्रश्नच आहे. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणे अजिबात सोपे नाही. आता रिजिजू विज्ञानाच्या नियमांशी दोन हात करण्याचा प्रयत्न करतील असे सिब्बल यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राबाबतचा निकाल भोवला का?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जो निकाल दिला, त्यामुळे तर रिजिजू यांच्याकडून विधि खाते काढून घेतले नसेल ना, असा सवाल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या व राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे. अदानी प्रकरणाचा सेबीकडून सुरू असलेला तपास हेही रिजिजूंबाबतच्या निर्णयामागचे कारण असेल का, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.