राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘आप’ कुणाच्या बाजूला? अद्याप भूमिका ठरली नाही : खासदार संजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 09:41 AM2022-06-26T09:41:34+5:302022-06-26T09:42:08+5:30
राष्ट्रपतिपदासाठी येत्या सोमवारला विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु अद्यापही आपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
सुरेश भुसारी -
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) कुणाला मतदान करणार, हे अद्यापही स्पष्ट न झाल्याने आप पक्षाचे लोकप्रतिनिधी या महत्त्वपूर्ण निवडणुकीत कुणाच्या पारड्यात मते टाकतील की तटस्थ राहतील, हे स्पष्ट झालेले नाही.
आपचे खासदार संजय सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर आप विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देईल, असे बोलले जात होते. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या १५ जूनला बोलाविलेल्या विरोधकांच्या बैठकीला आपचा प्रतिनिधी राहिला नव्हता. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत आम आदमी पार्टीची भूमिका अद्याप ठरलेली नसल्याचे आपचे खासदार संजय सिंह यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या आपचा लोकसभेत एकही सदस्य नाही. राज्यसभेत १० सदस्य तर १५६ आमदार आहेत.
आपशी चर्चा करणार : सुधींद्र कुलकर्णी
राष्ट्रपतिपदासाठी येत्या सोमवारला विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु अद्यापही आपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात यशवंत सिन्हा यांचे निवडणूक प्रतिनिधी सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, आप नेत्यांशी लवकरच चर्चा करणार आहे.
बसपचा पाठिंबा -
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बसपने पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले की, आमच्या चळवळीचा प्रमुख भाग असलेल्या आदिवासी समाजातून मुर्मू आलेल्या असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. हा निर्णय आम्ही भाजप, एनडीएच्या समर्थनार्थ किंवा यूपीएच्या विरोधासाठी घेतलेला नाही. तर आमचा पक्ष आणि चळवळ लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.