दाती महाराजाला अटक का नाही?, तरुणीवर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:52 AM2018-06-28T04:52:08+5:302018-06-28T04:53:15+5:30

बलात्काराचा आरोप असलेल्या दाती महाराजाविरुद्ध वॉरंट निघूनही त्याला अद्याप अटक का करण्यात आली नाही?

Why the accused is not arrested for the rape of the girl, the lady of the kingdom? | दाती महाराजाला अटक का नाही?, तरुणीवर बलात्काराचा आरोप

दाती महाराजाला अटक का नाही?, तरुणीवर बलात्काराचा आरोप

Next

नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप असलेल्या दाती महाराजाविरुद्ध वॉरंट निघूनही त्याला अद्याप अटक का करण्यात आली नाही? असा सवाल दिल्लीच्या न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल दर आठवड्याला आपणास सादर करावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
स्वत:ला दैवी अवतार म्हणवून घेणाºया दाती महाराजाने आपल्या शनी आश्रमात दोन वर्षांपूर्वी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका तरुणीने केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सर्च वॉरंटही काढण्यात आले आहे. तरीही दिल्ली पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळेच न्यायालयाने नापसंती व्यक्त करीत, याबद्दल अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्ली पोलिसांना दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे.

महिला आयोगानेही केली विचारणा
तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या दिल्ली, तसेच राजस्थानातील पाली येथील आश्रमात तपास केला होता, पण त्याने बलात्कार केल्याचा पुरावा सापडला नसल्याचे पोलीस सांगत आहेत. दाती महाराज व त्याचे तीन साथीदार यांची पोलिसांनी १९ जून तसेच काल, मंगळवारी रोजी चौकशी केली होती, असे समजते. मात्र, बलात्काराचा आरोप असूनही त्याला अटक न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दिल्ली महिला आयोगानेही दाती महाराजाला अटक का केली नाही, असे पत्र दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.

मुलाखतींमध्ये निर्दोष असल्याचा दावा
दिल्लीच्या छतरपूर भागात दाती महाराजाचा शनी आश्रम आहे. तिथे आपणावर बलात्कार करण्यात आल्याचा २५ वर्षीय तरुणीचा आरोप असून, तिने तशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीनंतर त्याने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. आपण निर्दोष आहोत, पोलिसांना सहकार्य करण्याची आपली तयारी आहे, असे तो वारंवार मुलाखतीतून सांगत होता.


चहाच्या दुकानापासून आश्रमापर्यंत
दाती महाराजाचे मूळ नाव मदनलाल पंडित असून, आई-वडील वारल्यानंतर तो दिल्लीच्या फतेहपूरबेरी भागात चहाचे दुकान चालवत असे. त्यानंतर, त्याने विटा, वाळू, सीमेंटचा व्यवसाय केला. पुढे मंडप डेकोरेशनचा त्याचा व्यवसाय होता. नंतर त्याने कॅटरिंगचा धंदा सुरू केला. मात्र, १९९६ मध्ये त्याची एका ज्योतिषाशी ओळख झाली. त्याच्याकडून शिकून तो स्वत: ज्योतिषी झाला आणि भविष्य सांगू लागला. याच काळात त्याने स्वत:चा आश्रम सुरू केला आणि दाती महाराज म्हणून त्याची लोकांना ओळख झाली. अनेक राजकीय नेत्यांना तो सल्ले देतो, असे सांगण्यात येते. मध्यंतरी एका वृत्तवाहिनीवर तो भविष्य सांगण्याचा कार्यक्रम सादर करीत असे.

Web Title: Why the accused is not arrested for the rape of the girl, the lady of the kingdom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.