अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 04:41 AM2019-11-14T04:41:45+5:302019-11-14T04:42:35+5:30
महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही?
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही? कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी तर अमित शहा यांनी जागा वाटपाबाबत बंद दरवाजाआड उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती आणि हा मुद्दा सोडविला होता. त्यावेळी जागा वाटपावरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली होती. मग आता नेमके काय झाले? अमित शहा शिवसेनेवर का रागावलेले आहेत?
यावेळी मात्र अमित शहा ना मुंबईला आले ना उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. विधानसभा निवडणुकांनंतर त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. निवडणुकीपूर्वी, ‘लोकमत’शी अनौपचारिकपणे बोलताना अमित शहा यांनी सत्तेचा ५० : ५० टक्के फॉर्म्युला असल्याचे नाकारले होते. हा राजकीय पेच सोडविण्यासाठी त्यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही आणि शिवसेनेला अन्य पर्याय खुले असल्याचे सांगितले. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने आपला सूर बदलला आणि आक्रमक भूमिकेत मर्यादा ओलांडल्या. भाजप सूत्रांचे असे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांनी विधाने करण्याऐवजी अमित शहा यांच्यासोबत बैठकीसाठी आग्रह धरायला हवा होता; पण शिवसेनेच्या या भूमिकेनंतर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा निर्णय केला की, शिवसेनेला काय करायचे ते करू द्या. आता २४ नोव्हेंबर रोजी आशेचा किरण आहे. त्यादिवशी उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ शकतात.
>बंद दाराआडील चर्चा सार्वजनिक का?
सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने ‘लाईन क्रॉस’ करून मीडियात वक्तव्ये केली त्यावरून अमित शहा हे अतिशय नाराज होते. त्यांच्या ६, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी अमित शहा हे अतिशय रागावलेले होते. बंद दाराआड झालेली चर्चा उद्धव ठाकरे हे मीडियासमोर का सांगत आहेत? यावरून ते नाराज होते. या बैठकीच्या गोपनीयतेबाबत त्यांनी एवढी काळजी घेतली होती की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुंबईतील या चर्चेत सहभागी करून घेतले नव्हते. या घडामोडींनंतर अमित शहा यांनी गप्प राहणेच पसंत केले. शिवसेना जेव्हा कमी जागा लढण्यासाठी तयार झाली, तर मग मुख्यमंत्रीपदावर ते दावा कसा काय करू शकतात? याचेही अमित शहा यांना आश्चर्य वाटले.