हनीट्रॅपची चौकशी करणारे वारंवार का बदलले जातात? इंदूर खंडपीठाचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:11 AM2019-10-05T06:11:36+5:302019-10-05T06:12:02+5:30
हनीट्रॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि पथकातील सदस्यांत वारंवार बदल करण्याचे कारण काय?
- मुकेश मिश्रा
इंदूर : हनीट्रॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि पथकातील सदस्यांत वारंवार बदल करण्याचे कारण काय? अशी विचारणा करून मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने सरकारला या प्रकरणाचा चौकशी अहवाल आणि एसआयटीतील सदस्य बदलण्याचे कारण २१ आॅक्टोबरपूर्वी लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश राज्याच्या गृह सचिवांना दिले आहेत. याप्रकरणी खंडपीठ २१ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी घेणार आहे.
या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करणे आणि उच्च न्यायालयाची एक समिती स्थापन करून चौकशीवर निगराणी ठेवण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका वरिष्ठ वकील अशोक चितळे, मनोहर दलाल आणि लोकेंद्र जोशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असताना सरकार एसआयटीत वारंवार बदल का करीत आहे? सरकार आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांमार्फत मनमानीपणे चौकशी करू पाहत आहे. अधिकारी चौकशी सुरू करताच काही दिवसांत त्या अधिकाºयाला हटविले जाते, असे याचिकेत म्हटले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अलीकडेच सरकारने एसआयटीप्रमुख डॉ. संजीव शमी यांना हटवून त्यांच्या जागी राजेंद्र कुमार यांना एसआयटीचे प्रमुख केले आहे.
श्वेता सूत्रधार - अमित सोनी
हॅनीट्रॅपची सूत्रधार श्वेता विजय जैन आहे, असा दावा आरोपी बरखा भटनागर सोनीचे पती अमित सोनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. माझी पत्नी निर्दोष असून तिला फसविण्यात आले, असा खुलासाही केला आहे. पंधरवडा उलटल्यानंतरही हनीट्रॅप प्रकरणात रोज नवीन खळबळजनक माहिती समोर येत आहे. सोबत स्वत: निर्दोष असल्याचे सांगत पोलिसांना जबाबदार धरले जात आहे.