शाळा सुरू करण्यासाठी राज्यांची घाई कशाला?; डॉ. नरेश त्रेहान यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:19 AM2021-08-30T08:19:18+5:302021-08-30T08:19:32+5:30
अगोदर मुलांचे लसीकरण तरी होऊ द्या, काळजी घेण्याचे केले आवाहन
नवी दिल्ली : राज्य सरकारे शाळा सुरू करण्यासाठी जी घाई करीत आहेत त्या पार्श्वभूमीवर मेदांताचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी रविवारी मुलांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठीची लसीकरण मोहीम अजून जाहीर झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे, अशा शब्दांत इशारा दिला आहे.
“आम्ही आणखी काही महिने संयम राखला पाहिजे. लसीकरण मोहीम सुरू होईल आणि त्यानंतर मुलांना लस मिळेल व ते शाळेत जाऊ शकतील. आम्ही शाळा सुरू करण्यासाठी एवढी घाई का करीत आहोत? त्याचे कारण काय? मला तरी माहीत नाही,” असेही डॉ. त्रेहान म्हणाले.
भारतात मुलांना सध्या लस दिली जात नाही याची आठवण करून देऊन त्रेहान म्हणाले, “जर मोठ्या संख्येने मुले आजारी पडली तर त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे चांगली व्यवस्था नाही. आमची प्रचंड आकाराची लोकसंख्या पाहता आम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. वस्तुस्थिती ही आहे की लस काही दिवसांत उपलब्ध होईल, असे डॉ. त्रेहान अहमदाबादस्थित झायडस कॅडिला कंपनीच्या तीन मात्रांच्या झायकोव्ह-डी लसीचा संदर्भ देऊन म्हणाले.