वारंवार भूकंप का होताहेत? भारतात कुठे आहे सर्वाधिक धोका, धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:17 PM2023-11-06T18:17:03+5:302023-11-06T18:18:07+5:30
Earthquake : गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत भारतातील उत्तर भाग भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के बऱ्याच वेळापर्यंत जाणवत राहिले. दरम्यान, या भागात वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवत आहेत, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? भारतातील कुठले भाग हे भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत, हे आपण जाणून घेऊयात.
जेव्हा टेक्टोनिक प्लेट्सच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन होते. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर जी उर्जा बाहेर पडते, त्यालाच भूकंप म्हटलं जातं. या प्लेट्स खूप संथगतीने फिरत असतात. तसेच दरवर्षी आपल्या जागेवरून ४ ते ५ मिमीपर्यंत सरकतात. अशा परिस्थितीत कुठली तरी प्लेट कुठल्या तरी प्लेटपासून दूर जाते किंवा कुठल्यातरी प्लेटच्या खाली सरकते. या प्रक्रियेदरम्यान प्लेट्स आदळल्याने भूकंप येतो.
गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यात झोन-१, झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन ५ अशी विभागणी झालेली आहे. त्यापैकी झोन २ म्हणजे सर्वात कमी धोका आणि झोन ५ म्हणजे सर्वाधिक धोका असे निश्चित करण्यात आले आहे. भूकंपाच्यादृष्टीन झोन ५ हा सर्वाधिक धोकादायक असतो.
झोन ५ - भारतामधील झोन ५ मध्ये संपूर्ण पूर्वोत्तर भारत, जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचं रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश आहे. या भागात भूकंपाचे धक्के साततत्याने जाणवत असतात.
झोन ४ - झोन-४ मध्ये जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे इतर भाग, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, बिहार आणि पश्चिम बंगाल, गुजरातचा काही भाग, पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्राच्या काही भागाचा आणि राजस्थानचा समावेश होतो.
झोन ३ - यामध्ये केरळ, बिहार, पश्चिम राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र उत्तर प्रदेश, पूर्व गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागाचा समावेश होतो.
झोन २ - झोन २ मध्ये राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेशचा काही भाग, पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
झोन १ - भूकंपाच्या दृष्टीने सर्वात कमी धोका असलेला झोन म्हणजे झोन-१ यामध्ये पश्चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व महाराष्ट्र आणि ओदिशा यांचा समावेश होतो.
मागच्या काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास भारतामध्ये दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के सातत्याने जाणवत आहेत. तज्ज्ञांच्या मते हा चिंतेचा विषय आहे. तसेच त्यावर सातत्याने अभ्यास सुरू आहे.