बॅलेट पेपरने मतदान झालेल्या भागात भाजपाचा निकाल इतका खराब का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 05:48 PM2017-12-02T17:48:35+5:302017-12-02T17:55:33+5:30
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
लखनऊ - समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी शनिवारी बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी केली. त्यानंतर लगेचच अखिलेश यांनी काल जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निकालाचा डाटा टि्वटरवर शेअर केला आणि मायावतींच्या मागणीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले.
ज्या भागात बॅलेट पेपरने मतदान झाले तिथे भाजपाने फक्त 15 टक्के जागा जिंकल्या आणि ईव्हीएम मशीनचा वापर झालेल्या भागात भाजपाने 46 टक्के जागा जिंकल्या असे अखिलेश यांनी टि्वटमध्ये म्हटले होते. या दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडले.
BJP has only won 15% seats in Ballot paper areas and 46% in EVM areas.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 2, 2017
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपरने मतदान झाले तर भाजपाचा पराभवच होईल असा दावा मायावती यांनी केला. जनता आपल्यासोबत आहे असा भाजपाचा दावा असेल तर त्यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी. 2019 सालची लोकसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली तर मला पूर्ण विश्वास आहे कि, भाजपा सत्तेवर येणार नाही असे मायावती म्हणाल्या.
उत्तर प्रदेशात मोदी लाट कायम, अयोध्या-आग्र्यात भाजपाची बाजी
उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम आहे. महापौरपदाच्या 16 जागांपैकी अयोध्या आणि आग्र्यातील जागेवर भाजपाचा कब्जा केला आहे, तर इतर 12 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे आहे. बीएसपीनं अलिगड आणि मेरठमध्ये मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपानं एकूण 14 जागांवर विजय संपादन करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दबदबा कायम ठेवला आहे.
गोरखपूरमधल्या वॉर्ड क्रमांक 68च्या भाजपा उमेदवार माया त्रिपाठी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. या जागेवरून अपक्ष उमेदवार नादिर यांचा विजय झाला आहे. या वॉर्डातच गोरखनाथ मंदिर आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत भाजपाला विजय मिळाला आहे. नगर पंचायत निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. पहिल्यांदाच चार नगरपालिकेत कमळ उमललं आहे.