कॅन्सरच्या औषधांवर 5000% पर्यंत नफा कमावतात रुग्णालये; 2600 ला मिळतं 225 रुपयांचं इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 05:07 PM2022-10-12T17:07:03+5:302022-10-12T17:16:50+5:30
कॅन्सरवरील महागड्या उपचारामागील एक प्रमुख कारण म्हणजे औषधांचा अवाजवी खर्च. एमआरपीवर ही औषधे विकून रुग्णालये मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत.
कॅन्सरसारखा गंभीर आजाराचा अनेक जण सामना करत आहेत. भारतात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी रुग्णांची संख्या 19 ते 20 लाखांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. FICCI आणि EY च्या रिपोर्टनुसार, कॅन्सरच्या रुग्णांची वास्तविक संख्या नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 1.5 ते 3 पट जास्त असू शकते. रुग्ण जर गरीब कुटुंबातील असेल तर सुरुवातीला पूर्ण उपचार मिळत नाहीत. उपचार झाले तरी त्यावर होणाऱ्या खर्चामुळे कुटुंब अनेक वर्षे कर्जबाजारी होतं.
कॅन्सरवरील महागड्या उपचारामागील एक प्रमुख कारण म्हणजे औषधांचा अवाजवी खर्च. एमआरपीवर ही औषधे विकून रुग्णालये मोठ्या प्रमाणात कमाई करत आहेत. हे मार्जिन इतके आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयांद्वारे विकल्या जाणार्या औषधांवरील ट्रेड मार्जिन 2,000 टक्क्यांहून अधिक आहे. अनेक प्रकरणांमध्ये ते 5,000 टक्क्यांपर्यंतही आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या औषधांच्या किमती सरकारकडून ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर (DPCO) द्वारे निश्चित केल्या जातात.
औषधांची खरी किंमत आणि एमआरपी यात मोठी तफावत
खासगी रुग्णालये रुग्णांकडून ज्या प्रकारे अवाजवी शुल्क आकारतात, त्यावरून ते औषधांच्या नावाने रुग्णांची लूट करतात. एलायन्स ऑफ डॉक्टर्स फॉर एथिकल हेल्थकेअरचे डॉ. जी.एस. ग्रेवाल यांनी नुकतेच एनपीपीएला हॉस्पिटल्स आणि केमिस्टकडून औषधांवर मिळणाऱ्या ट्रेड मार्जिनबाबत एक रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये दोन डझन औषधांचा तपशील देण्यात आला आहे. या औषधांची खरी किंमत आणि एमआरपी यात मोठी तफावत आहे. खासगी रुग्णालये ही औषधे रुग्णांना एमआरपीवर विकून मोठा नफा कमावत आहेत. रूग्णालयाला रेटलान इंजेक्शन 225 रुपयांना दिले जाते आणि त्याची एमआरपी 2600 रुपये आहे. हे इंजेक्शन रक्तस्त्राव थांबवण्यासाठी वापरले जाते.
900 रुपयांना विकत घेतात आणि 6597 रुपयांना विकतात
अनेक औषधांवर रुग्णालये 2,000 टक्के नफा कमावत आहेत. NPPA ला सादर केलेल्या दस्तऐवजात असे सांगण्यात आले होते की, जेमसेटाबीन 1GM, जे कॅन्सरमध्ये वापरले जाते, ते रुग्णालये 900 रुपयांना विकत घेतात आणि 6597 रुपयांना विकतात. याशिवाय, रुग्णालयांमध्ये 1350 रुपयांना उपलब्ध असलेल्या सिलिटॅक्स 260 एमजी या अँटी-कॅन्सर इंजेक्शनची एमआरपी 11,946 रुपये आहे. त्याचप्रमाणे Oxyplatin 100 Injection 1090 ला विकत घेतले जाते आणि 5210 ला विकले जाते. तसेच इतर अनेक औषधांवर रुग्णालयांना 2,000 टक्क्यांपर्यंत नफा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.