‘डेस्टिनेशन वेडिंग’ विदेशात कशाला? देशातच करावे; पंतप्रधानांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 06:36 AM2023-11-27T06:36:41+5:302023-11-27T06:38:45+5:30
Destination Wedding: देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.
नवी दिल्ली - देशातील श्रीमंत कुटुंबीयांकडून डेस्टिनेशन वेडिंग म्हणून विदेशात आलिशान विवाह सोहळे आयोजित केले जातात. परंतु, त्यातून देशातील चलन विदेशात जात असल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. विवाह सोहळे देशातच आयोजित करून ‘वोकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन द्यावे, असे आावाहन त्यांनी केले. ‘मन की बात’मध्ये ते बोलत होते.
अनेक लोक ‘मेड इन इंडिया’ वस्तूंना प्राधान्य देत आहेत. परंतु, ही मागणी केवळ सणांपुरतीच मर्यादित नसावी. लवकरच लग्नांचा हंगाम सुरू होणार आहे. यंदा लग्नसराईमध्ये सुमारे ५ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली. परंतु, देशातील काही कुटुंब परदेशात लग्न करतात. तेच देशात केल्यास देशातील पैसा देशातच खर्च होतील. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग परदेशात न करता देशातच करून ‘वोकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन द्यावे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
हुतात्म्यांना आदरांजली
मोदी यांनी मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, २६ नोव्हेंबरचा दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. अतिरेक्यांनी त्यावेळी केवळ मुंबईच नव्हे, तर देशावर हल्ला केला होता. परंतु, आपला देश दहशतवादाला सामर्थ्याने तोंड देत त्यावर मात करत आला आहे.
बौद्धिक संपदेत प्रगती
बौद्धिक संपदा क्षेत्रात देशाची प्रगती होत असून, २०२२ मध्ये देशात पेटंट मिळविण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले. पेटंटमुळे केवळ देशाच्या बौद्धिक संपदेत वाढ होत नाही, तर त्यातून नवनव्या संधी तयार होतात. स्टार्टअप, नवसंशोधनासाठी विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.