मोदींना परदेशी दाढीवाल्यांबद्दल इतके प्रेम का? - ओवैसी
By admin | Published: January 27, 2017 12:55 PM2017-01-27T12:55:26+5:302017-01-27T12:57:20+5:30
अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे देशात हात पसरवून खुल्या मनाने स्वागत करण्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे देशात हात पसरवून खुल्या मनाने स्वागत करण्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.
'पंतप्रधान मोदींना परदेशी दाढीवाल्यांबद्दल इतकं प्रेम आहे, तर हेच प्रेम ते देशातील दाढीवाल्यांबाबत का दाखवत नाही', असे टीकास्त्र ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर सोडले आहे. उत्तर प्रदेशातील अलिगड येथील निवडणूक प्रचाराच्या भाषणामध्ये त्यांनी हे खरमरीत विधान केले आहे.
अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजधानी दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. यावरुन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'आम्हीही आपल्या पाहुण्यांचा सन्मान करतो. अर्थात अबूधाबीचे राजपुत्र यांचेही स्वागत योग्य पद्धतीने होणे गरजेचे होते. मात्र यावेळी मोदी पहाटे योगासने करायला विसरले असे वाटत होते.जेव्हा राजपुत्र दिल्लीत आले त्यावेळी हात पसरवून योगा करत त्यांनी त्यांचे स्वागत केले. जर मोदींना परदेशी दाढीवाल्यांबाबत इतके प्रेम आहे, तर हेच प्रेम देशातील दाढीवाल्यांबद्दल का दाखवत नाही', असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी ओवैसी यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय काळजीपूर्वक 'मुस्लिम' शब्द वापरणं टाळलं. कोणताही नेत्याने धर्माच्या आधारे मत मागू नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या पार्श्वभूमी आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी त्यांनी मुस्लिम शब्द आपल्या भाषणात वापरला नाही. मोदींव्यतिरिक्त ओवैसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे वडील मुलायम सिंह यांच्यावरही तोफ डागली. या दोघांचा 'छोटे मियाँ, बडे मियाँ' असा उल्लेख करत विकास कामांच्या त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. 'उत्तर प्रदेशात विकास झाल्याचे बडे मियाँ आणि छोटे मियाँ दावा करत आहेत. मात्र विकास केवळ त्यांच्या कुटुंबाचा झाला आहे, सर्वसामान्य जनतेचा नाही', असा आरोप करत ओवैसींनी यादव पिता-पुत्रांचा 'ड्रामा कंपनी' असा उल्लेख केला.