सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 02:01 AM2021-01-16T02:01:58+5:302021-01-16T12:50:37+5:30
सरस्वती नाकारणारे यशवंत मनोहर काही पहिले नाहीत. पण ‘समांतरा’ला पंखाखाली घेण्याच्या संघ-प्रयत्नांना त्यांनी खो दिला!
श्रीमंत माने
सारं सामसूम असताना, वड कलंडतील असे झंझावात कुठे गेले, असे विचारण्यासारख्या परिस्थितीत आंबेडकरी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी सरस्वती मूर्तीच्या मुद्द्यावर विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार अखेरच्या क्षणी नाकारल्यामुळे तलावावर चार तरंग उमटले. मकरसंक्रांत हा विदर्भ साहित्य संघाचा स्थापनादिन. यंदा एका दक्षिणपंथी लेखकाचे उत्तरायण सुरू व्हायचे होते, ते झाले नाही. ‘गांधी का मरत नाही?’ - या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखडे यांनी मात्र याच समारंभात पुरस्कार स्वीकारला, याबाबत आपली भूमिकाही त्यांनी मांडली. पुरस्कार नाकारायचाच होता तर आधी स्वीकारायची संमती कशाला दिली, त्या पुरस्काराच्या निमित्ताने झालेले सत्कार का स्वीकारले, असा प्रतिहल्ला मनोहर यांच्यावर आता सुरू आहे. दुसरीकडे, साहित्य संघाच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच मनोहर ‘संघम् शरणम्’ करीत होते, ते थबकल्याचे समाधान पुरोगामी वर्तुळात आहे.
सरस्वती हे धर्माचे व शोषणव्यवस्थेचे प्रतीक असल्याने आपण तिच्या मूर्तीच्या साक्षीने पुरस्कार स्वीकारू शकत नाही, ही मनोहर यांची भूमिका आहे. सरस्वती नाकारणारे ते पहिले नाहीत. महाराष्ट्रात तर सावित्रीबाई फुले यांच्या कर्तबगारीमुळे ‘सरस्वती की सावित्री’ हा परंपरागत वाद आहे.
विद्या बाळ विचारायच्या, ‘‘सरस्वतीच्या अस्तित्वाचा पुरावा नाही. सावित्रीच्या मात्र आहे. हिंदू देवीला नमन करून अन्य धर्मीयांच्या मुलांनी का शिकावे?’’ - मनोहरांची भूमिका या व्यवहारी युक्तिवादाच्या पुढची आहे. तिला प्रस्थापित-परिवर्तनवादी संघर्षाचे कंगोरे आहेत. आताशा वैचारिक सरहदी पुसट बनल्या आहेत. चळवळी क्षीण झाल्या आहेत. काही दशकांपूर्वी विद्रोही, परिवर्तनवादी चळवळ, साहित्यिकांचा राजकारणावर अंकुश होता. मधल्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या शकलांसारखीच आंबेडकरी साहित्यिकांमध्ये फूट पडली. कुणी रामदास आठवलेंच्या गाेटात गेले, तर कुणी प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे किंवा अन्य कुणांच्या. प्रवाह सामाजिक, सांस्कृतिक असो की आणखी कोणता, समांतर प्रवाहाच्या प्रवासात एक टप्पा येतोच की समांतर प्रवाहातील अनेकांना मान्यतेचा, प्रतिष्ठेचा मोह खुणावतो. प्रस्थापितांचा मुख्य प्रवाह सामावून घेईल, असे वाटायला लागते. त्यासाठी आयुष्य ज्या प्रवाहात काढले त्याला थोडी बगल देण्याची हिंमत येते. पण, किमान महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, की असे करणाऱ्यांना पुढे ना मुख्य प्रवाह खऱ्या अर्थाने सन्मान देतो, ना आधीच्या वर्तुळात पूर्वीचे स्थान राहते!
यशवंत मनोहर मोठे साहित्यिक, विचारवंत आहेत. काही दशकांपूर्वी गंगाधर पानतावणे यांच्या समरसता मंचावरील उपस्थितीवेळी त्यांना खडसावून जाब विचारणाऱ्यांमध्ये मनोहर आघाडीवर होते. ग. त्र्यं. माडखोलकरांशी मैत्रीचे संबंध असल्यानेच गंगाधर पानतावणे यांची वैचारिक निष्ठा पातळ झाली व प्र. ई. सोनकांबळे यांच्यासोबत ते समरसता मंचाच्या व्यासपीठावर गेले, असे म्हणून त्यांना आंबेडकरी समाजापुढे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. तेच मनोहर आता म्हैसाळकरांच्या मैत्रीखातर थेट माडखोलकरांच्याच नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारत असतील, तर ते आंबेडकरी चळवळ, व समाज सहजपणे कसा स्वीकारील? थोड्याशा अपराधीपणासोबतच ही जाणीव अगदी शेवटच्या क्षणी यशवंत मनोहर यांना झाली असावी. पुरस्काराचा स्वीकार व नकार यातील मनोहर यांची चलबिचल या पृष्ठभूमीवर समजून घ्यायला हवी. ...किंवा ‘ते सरस्वतीच्या मूर्तीचे काय ते प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी पाहू’, असे विदर्भ साहित्य संघाकडून सांगण्यात आले असावे. कदाचित कोरोना महामारीमुळे हा समारंभ ऑनलाइनच होईल, असा कयास असावा.
अर्थात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाआधी दोन वर्षे स्थापन झालेल्या, दोन वर्षांनंतर शताब्दी साजरी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाची सांस्कृतिक, वैचारिक बैठक, आतापर्यंतचे अध्यक्ष, साहित्य संमेलने, पुरस्कार वगैरेंबद्दल यशवंत मनोहर यांना नव्याने सांगावे, अशी स्थिती नाही. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी म्हटल्याप्रमाणे, सरस्वतीची मूर्ती किंवा धर्माधिष्ठित असे जे काही असेल तो संघाचा कुळाचार आहे व यशवंत मनोहरांचे तत्त्व सांभाळावे, म्हणून संघ तो साेडणार नाही. थोडक्यात, दोन्ही फळ्यांनी आपापल्या चौकटी पुन्हा घासूनपुसून ठळक बनविल्या आहेत. समांतर नावाचे जे काही असेल ते पंखाखाली घेण्याच्या संघाच्या प्रयत्नांना ठेच लागली आहे.
( लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत )