नितीन गडकरींनी देवेंद्र यांच्यासाठी 'सत्तेचा महामार्ग' का बांधला नाही?... वाचा त्यांचंच उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:41 PM2019-12-17T19:41:48+5:302019-12-17T19:43:47+5:30
विधानसभा निवडणूक निकालापर्यंतचा सगळा प्रवास व्यवस्थित झाला असताना, महाराष्ट्रात एक 'स्पीड ब्रेकर' आला आणि अपघात झाला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण झालेल्या सत्तापेचातून तोडगा काढण्यासाठी भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फारसे पुढे आल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. 'राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं', या त्यांच्या विधानाची बरीच चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे ते खरंही झालं होतं. परंतु, शेवटच्या चेंडूवर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीनं सत्तास्थापनेचा विजयी षटकार ठोकला आणि आता सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी बाकांवर बसला आहे. या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरी यांनी भाजपा-शिवसेनेत मैत्रीचा पूल का बांधला नाही, भाजपासाठी - देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सत्तेचा महामार्ग का बनवला नाही, असे प्रश्नही अनेकांच्या मनात आहेत. त्यांचं उत्तर नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत दिलं.
विधानसभा निवडणूक निकालापर्यंतचा सगळा प्रवास व्यवस्थित झाला असताना, महाराष्ट्रात एक स्पीड ब्रेकर आल्यानं अपघात झाला होता. हा अपघात टाळण्यासाठी तुम्ही काही केलं नाही का, या प्रश्नावर नितीन गडकरी गमतीनं म्हणाले की, माझ्या खात्याचा रस्ते सुरक्षा कायदा तिथे लागू नव्हता. म्हणजेच, त्या विषयाची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. देवेंद्र फडणवीस सक्षम होते. ते प्रयत्न करत होते. त्यांना मदत लागेल तेव्हा आम्ही बोलत होतो. परंतु, मी काही करायचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी नेमकं काय झालं हे देवेंद्र फडणवीस किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहाच सांगू शकतील, असं गडकरींनी 'आज तक'च्या कार्यक्रमात स्पष्ट केलं.
देवेंद्र यांच्यासाठी तुम्ही रस्ता बांधणार नाही का, असं विचारताच, रस्त्याच्या कामासाठी आधी टेंडर निघतं, मग कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि नंतर वर्क ऑर्डर निघते, असं ते हसत हसत म्हणाले.
मी डिप्लोमसी करत नाही!
सत्तापेचावेळी मुख्यमंत्रिपदासाठीही नितीन गडकरींच्या नावाची चर्चा झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि शिवसेनेचीही त्यांच्या नावाला संमती असल्याचं बोललं गेलं होतं. त्याबाबत विचारताच, या सगळ्या चर्चा नितीन गडकरींनी खोडून काढल्या. मी राजकारणी नाही. मी डिप्लोमसी करत नाही. जे बोलतो ते मी करतो. काही वर्षांपूर्वी मला दिल्लीत यायची इच्छा नव्हती. पण, भाजपाध्यक्ष म्हणून मी दिल्लीत आलो आणि आता मला दिल्ली सोडायची नाही. मलाही जायचं नाही आणि मला कुणी पाठवतही नाही, असं नमूद करत त्यांनी 'महाराष्ट्र वापसी'च्या चर्चांवर पडदा टाकला.
राज्यातील सत्ताही निश्चितच महत्त्वाची आहे. पण, मला जे काम करायची संधी मिळालीय, त्यावर माझा फोकस आहे. राजकारणापेक्षा काही टार्गेट मी निश्चित केली आहेत, ती मला पाच वर्षात पूर्ण करायची आहेत, असं गडकरी म्हणाले. नमामि गंगे, बद्रीनाथ-केदारनाथ आणि मानसरोवरला जाणं सुकर करणारा मार्ग, मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे हे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धारच त्यांनी केला आहे.
विकासाच्या कामात राजकारण करणं मला आवडत नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, असदुद्दीन ओवैसी, अरविंद केजरीवाल या सगळ्यांना आपण विकासकामांमध्ये सर्वतोपरी मदत केल्याचंही गडकरींनी नमूद केलं.
केवळ संधीसाधू राजकारण!
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार किती काळ टिकेल, या प्रश्नावर गडकरींनी थेट उत्तर दिलं नाही. मात्र, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला चिमटा काढला. जे कधी एकमेकांना भेटत नसत, एकमेकांकडे पाहून हसत नसत, ते संधीसाधू राजकारणासाठी एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही समस्या असल्याचंही ते म्हणाले.