भारतातील लाखो मुस्लिम मुलींपैकी तुम्ही एकाही मुलीशी का लग्न केले नाही ? दिना वाडियांनी मोहम्मद अली जिनाना विचारला होता प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 11:06 AM2017-11-03T11:06:46+5:302017-11-03T11:16:35+5:30
20 व्या शतकाच्या आरंभी जिना यांनी रतनबाई पेटिट यांच्याशी लग्न केले. त्यावेळी रतनबाई 16 वर्षांच्या तर जिना 42 वर्षांचे होते. रतनाबाई या सर दिनशॉ पेतित यांची एकुलती एक मुलगी होती.
मुंबई - पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या कन्या दिना वाडिया यांचे गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये निधन झाले. त्या 98 वर्षांच्या होत्या. जिना यांचे दोन विवाह झाले होते. जिना यांना दुसरी पत्नी रतनबाई पेटिट यांच्यापासून दिना यांच्यारुपाने अपत्यप्राप्ती झाली. दिना मोहम्मद अली जिना यांचे एकमेव अपत्य होते.
20 व्या शतकाच्या आरंभी जिना यांनी रतनबाई पेटिट यांच्याशी लग्न केले. त्यावेळी रतनबाई 16 वर्षांच्या तर जिना 42 वर्षांचे होते. रतनाबाई या सर दिनशॉ पेतित यांची एकुलती एक मुलगी होती. दिनशॉ यांनी मुंबईत पहिली कपडा मिल सुरु केली. मुंबईतील नामवंत उद्योगपती, समाजसेवक अशी दिनशॉ पेतित यांची ओळख होती.
दिना या बिनधास्त स्वभावाच्या होत्या. लग्नाच्यावेळी सुद्धा त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा, ठामपणा, दिसून आला होता. वडिल मोहम्मद अली जिना यांचा विरोध पत्करुन त्यांनी नेविल वाडिया यांच्याशी लग्न केले होते. 1930 साली दिना यांनी वडिलांसमोर नेविल वाडिया यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी आपली मुलगी पारसी मुलाबरोबर लग्न करणार हे जीन यांना सहन झाले नाही. ते दिना यांच्यावर चिडले. भारतात लाखो मुस्लिम मुले आहे तू तुझ्या पसंतीने कुठल्याही मुस्लिम मुलाबरोबर लग्न केलेस तरी माझी काही हरकत नाही असे जिना यांनी सांगितले. त्यावर हजरजबाबी दिना यांनी लगेच उत्तर दिले. भारतात लाखो मुस्लिम मुली होत्या. तुम्ही त्यांच्यापैकी एकाबरोबर का लग्न केले नाही ?
त्यावेळी वडिलांचा विरोध पत्करुन दिना यांनी नेविल यांच्याबरोबर 1938 साली लग्न केले. पारसी कुटुंबातून आलेले नेविल त्यावेळचे मुंबईतील प्रख्यात उद्योजक होते. कुलाब्यातील कसरो बाग, भायखळयातील जेर बाग, रुस्तम बागचे त्यांनी बांधकाम केले होते. दिना यांनी लग्न केले त्यावेळी जिना भारतातील मुस्लिमांचे मोठे नेते होते. लग्नानंतर दिना आणि नेविल वाडिया यांचा संसार फार काळ चालला नाही. दोघेही विभक्त झाले. दिना यांना लग्नानंतर दोन अपत्ये झाली.
वाडिया ग्रुपचे सर्वेसर्वा नस्ली वाडिया हे त्यांचे पुत्र आहेत. लंडनमध्ये जन्मलेल्या दिना यांनी बराच काळ मुंबईत वास्तव्य केले. मागच्या काहीवर्षांपासून त्या अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला होत्या. नस्ली वाडिया यांचे आईबरोबर दृढ नाते होते. आईला भेटण्यासाठी ते ब-याचवेळा न्यूयॉर्कला जायचे. मी कुठेही असलो तरी दिवसातून एकदा आई बरोबर बोलतोच. आमच्या दोघांचे जितके दृढ नाते आहे तितके दुस-या कुठल्या आई-मुलाचे नाते असेल असे मला वाटत नाही असे नस्ली वाडिया 2008 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले होते. दिना वाडिया यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.