अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी मोदींनी महाकुंभमेळ्यात येण्यासाठी का निवडली ५ तारीख? असं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:45 IST2025-02-04T15:45:34+5:302025-02-04T15:45:55+5:30
Narendra Modi News: महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रयागराज येथे येणार आहेत. नरेंद्र मोदी हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. मात्र महाकुंभमधील अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी हा दिवस का निवडला याची चर्चा सुरू आहे.

अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी मोदींनी महाकुंभमेळ्यात येण्यासाठी का निवडली ५ तारीख? असं आहे कारण
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराज येथे येत आहेत. देशाबरोबरच परदेशातूनही हजारो लोक येत आहेत. दरम्यान, या महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रयागराज येथे येणार आहेत. नरेंद्र मोदी हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. मात्र महाकुंभमधील अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी हा दिवस का निवडला याची चर्चा सुरू आहे. तर मोदींनी हा दिवस निवडण्यामागचं खास कारण आणि त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
हिंदू पंचांगानुसार ५ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीमधील अष्टमी ही तिथी आहे. ती धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी तप ध्यान आणि साधना करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. या दिवशी जे लोक तप, ध्यान आणि स्नान करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. याशिवाय हा दिवस भीष्माष्टमीच्या रूपात ओळखला जातो. याबाबतच्या अधिकन माहितीनुसार महाभारतातील युद्धादरम्यान, शरशय्येवर पडलेले भीष्म पितामह हे सूर्याने उत्तरायणाला सुरुवात करण्याची आणि शुक्ल पक्षाच्या सुरुवातीची वाट पाहत होते. माघ महिन्याच्या अष्टमीदिवशी त्यांनी श्रीकृष्णाच्या उपस्थितीत आपले प्राण त्यागले. त्यानंत त्यांना मोक्ष प्राप्ती झाली.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे बुधवारी महाकुंभमध्ये जाणार असून, त्यांच्या कार्यक्रमात काही बदल करण्यात आला आहे. नव्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभमेळ्यात एक तासच थांबणार आहे. तसेच पूर्वनियोजित काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत. पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजू ५ मिनिटांनी प्रयागराज येथील विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर १० वाजून १० मिनिटांनी डीपीएस हेलिपॅडवर पोहोचतील. तसेच १० वाजून ४५ मिनिटांनी नरेंद्र मोदी हे अरेल घाट येथे उपस्थित राहतील.