पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रामललांकडे का मागीतली माफी? प्राण-प्रतिष्ठेनंतर म्हणाले, प्रभू क्षमा करा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:23 PM2024-01-22T17:23:31+5:302024-01-22T17:37:30+5:30
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय'ने आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी रामलला यांच्याकडे क्षमाही मागीतली.
अखेर तो क्षण आला, ज्याची कोट्यवधी रामभक्त डोळे लावून वाट बघत होते. अयोध्येतील राम मंदिरात रामलला यांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भाषण करताना पंतप्रधान नरेद्र मोदी भावूक झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय'ने आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी रामलला यांच्याकडे क्षमाही मागीतली.
मोदी म्हणाले, आमच्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला. आज मी प्रभू श्रीरामांकडे क्षमा मागतो. आमचे प्रयत्न, त्याग आणि तपश्चर्या यात काहीतरी कमी राहिली असेल की, आम्ही हे काम इतकी शतके करू शकलो नाही. आज ती उणीव भरून निघाली आहे. मला विश्वास आहे की, आज भगवान श्रीराम आपल्याला नक्कीच क्षमा करतील.
खरे तर,मंदिर निर्माणाला एवढा उशीर लागला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीरामांकडे क्षमा मागितली. मोदी म्हणाले, आता प्रभू श्रीराम टेन्टमध्ये नाही तर भव्य अशा मंदिरात राहतील. आज आपल्याला शतकानुशतकांच्या संयमाचा वारसा मिळाला आहे. आज आपल्याला रामाचे मंदिर मिळाले आहे. जे काही घडले आहे. त्याची अनुभूती देश आणि संपूर्ण जगातील राम भक्तांना होत असले, असा माझा विश्वास आहे.
हा क्षण अलौकिक आहे. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. मी नुकताच गर्भगृहात ऐश्वर्य चैतन्याचा साक्षीदार होऊन सर्वांसमोर हजर झालो आहे. सांगण्यासारखं खूप काही आहे पण कंठ फूटत नाही, असेही मोदी म्हणाले.