‘त्या’ मुलीला ताब्यात का घेतले? उच्च न्यायालयाचा पोलिसांना सवाल
By admin | Published: April 17, 2016 03:11 AM2016-04-17T03:11:16+5:302016-04-17T03:11:16+5:30
हंडवारामधील ज्या अल्पवयीन मुलीचा लष्करातील जवानाने विनयभंग केल्याची तक्रार आहे, त्या मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना कोणत्या कायद्याच्या आधारे तुम्ही ताब्यात घेतले,
श्रीनगर : हंडवारामधील ज्या अल्पवयीन मुलीचा लष्करातील जवानाने विनयभंग केल्याची तक्रार आहे, त्या मुलीला आणि तिच्या नातेवाईकांना कोणत्या कायद्याच्या आधारे तुम्ही ताब्यात घेतले, असा सवाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने पोलिसांना केला आहे. सदर १६ वर्षे वयाच्या मुलीच्या विनयभंगाच्या वृत्तानंतर मंगळवारी हंडवारामध्ये जमावाने जवानांवर दगडफेक केली होती. जवानांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत तीन जण ठार झाले आहेत.
त्या मुलीला आणि तिचे वडील तसेच मावशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेल्या त्या तिघांची सुटका करण्यात यावी, असा अर्ज तिच्या आईने केला होता. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा सवाल केला. त्या मुलीला मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर नेउन, तिचा जबाब नोंदवा, असा आदेशही न्यायालयाने दिला.
त्या तिघांना वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या समोर बळजबरीने नेता कामा नये, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे.
आपला विनयभंग झालेला नाही, असा जबाब कॅमेऱ्यासमोर देण्यासाठी मुलीवर आणि आमच्यावर पोलिसांनी दबाव आणला, अशी तक्रार तिच्या आईने पत्रकार परिषदेत केली.