भारतात दिल्ली एअरपोर्टवर न उतरता हिंडन एअरबेसवर का उतरलं शेख हसीना यांचं विमान?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:04 PM2024-08-05T21:04:31+5:302024-08-05T21:05:44+5:30
बांगलादेशात हिंसक आंदोलन पेटलं असून आंदोलनकर्ते पंतप्रधान निवासस्थानी घुसले आणि त्यांनी सर्व वस्तूंची नासधूस केली.
नवी दिल्ली - बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांचे विमान थेट भारताच्या दिशेने आले आणि गाजियाबाद येथील हिंडन एअरबेसवर लँड करण्यात आले. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना काही काळ भारतात राहतील त्यानंतर आणखी कुठेतरी जातील असं सांगितलं जात आहे. बांगलादेशात हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देशाची सत्ता लष्कराच्या हाती गेली.
मोठा दावा! शेख हसीनांना आर्मीनेच बांगलादेश सोडायला भाग पाडले, दिली ४५ मिनिटे...
बांगलादेशातून बाहेर पडलेल्या शेख हसीना या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील एअरपोर्टला न जाता गाजियाबाद येथील हिंडन एअरबेसला येण्यामागचं कारण समोर आलं आहे. सामान्यत: जेव्हा कुठल्याही देशाचा राष्ट्राध्यक्ष भारतात येतो तेव्हा त्यांचे स्वागत दिल्लीतील एअरपोर्टवरच होते. परंतु शेख हसीना यांच्याबाबत यावेळी असं काही झालं नाही. त्यांचे विमान उत्तर प्रदेशातील गाजियाबाद इथल्या हिंडन एअरबेसवर उतरवण्यात आलं. सोशल मीडियावर याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत मात्र त्यामागे खरे कारण भलतेच आहे.
वास्तविक, हिंडन हा आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे. जे वायूसेनेकडून नियंत्रित केले जाते. या एअरबेसवर भारताचे अनेक अणु-सक्षम विमाने आणि लढाऊ विमाने नेहमीच असतात. त्याशिवाय इथली सुरक्षा व्यवस्था सामान्य विमानतळाच्या सुरक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. शेख हसीना या ज्या परिस्थितीत भारतात आल्या ते सामान्य नाही. त्यामुळेच दिल्लीऐवजी शेख हसीना यांचे विमान हिंडन एअरबेसवर लँड करण्यात आले.
दिल्लीत शेख हसीना यांचं विमान उतरवलं असतं तर...
शेख हसीना यांचे विमान कुठे उतरवलं जाणार याबाबत माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव हसीना यांचे विमान कुठे लँड करणार हे सांगितले गेले नाही. भारतीय गुप्तचर यंत्रणेने रणनीतीनुसार शेख हसीना यांचे विमान दिल्लीत न उतरवता यूपीत उतरवलं. त्याशिवाय दिल्ली एअरपोर्ट वर्दळीचं ठिकाण आहे. त्याठिकाणी शेख हसीना यांचे विमान उतरवलं असतं तर सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागली असती. एअरपोर्टपासून सुरक्षित स्थळी घेऊन जाणं आव्हानात्मक झालं असतं. त्यामुळे दिल्लीऐवजी यूपीच्या हिंडन एअरबेसला शेख हसीना यांचं विमान उतरवण्यात आलं.