राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?; भगत सिंह कोश्यारींच्या वकिलांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:56 PM2022-08-03T13:56:02+5:302022-08-03T13:57:32+5:30
राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.
नवी दिल्ली/ मुंबई- राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे आणि नीरज कौल युक्तिवाद करत आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्या बाजूने तुषार मेहता यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला.
शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं केला. तुम्ही दोन तृतीयांश असला तरी मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. दोन तृतीयांश पक्ष असलेल्या दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकता. दोन तृतीयांश लोक दुसर्या पक्षात विलीन होणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे हा एकमेव मार्ग असल्याचं कपिल सिब्बल यांना यावेळी सांगितलं.
शिंदेगटाने फूट मान्य केली आहे. व्हीप हा राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षातील दुवा असतो. गट वेगळा असला तरी तुम्ही शिवसेनेचेच सदस्य आहात. त्यामुळे शिवसेनेचे आदेश पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तसेच राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय का घेतला?, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. यावर राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करणारे जनरल तुषार मेहता यांनी दीर्घ काळासाठी सरकार स्थापना खोळंबू शकत नाही असं उत्तर दिलं.
दरम्यान, आपला नेता भेटत नाही म्हणून नवा पक्ष स्थापन करु शकतो का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली. यावर शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी बंडखोर आमदार पक्षातच आहेत असं सांगितलं. यावर सरन्यायाधीशांनी तुम्ही सध्या कोण आहात? असं विचारलं असता आम्ही पक्षातील नाराज सदस्य असल्याचं सांगण्यात आलं. तसेच भारतामध्ये आपण अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष समजण्याची चूक करतो. जर पक्षातील काही लोकांना मुख्यमंत्री बदलावा असं वाटत असेल तर ही पक्षविरोधी नाही. हा पक्षांतर्गत मुद्दा आहे असं हरिश साळवे यांनी स्पष्ट केलं.
उद्या सकाळी पुन्हा होणार सुनावणी-
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून गुरुवारी सकाळी सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. उद्या कामकाज सुरु झाल्यानंतर ही सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल असं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना नव्याने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं आहे.