गुजरात सरकारला का कळालं नाही?; मोरबी दुर्घटनेवरून राष्ट्रवादीनं विचारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:51 PM2022-10-31T12:51:55+5:302022-10-31T12:52:17+5:30
अनेकांनी या दुर्घटनेत जीव गमावला आणि अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. गुजरातचे अधिकारी यातून स्वत:ची सुटका करू शकत नाहीत असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
मोरबी - गुजरात येथील मोरबी पूल कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात ज्यांनी स्वत:ची माणसं गमावली त्यांच्या कुटुंबाविषयी आम्हाला संवेदना आहेत. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत. नुकत्याच नूतनीकरण केलेल्या या पूलाचं काम सरकारी निविदा देऊन करण्यात आले होते. मग या घटनेसाठी गुजरात सरकारला जबबादार धरले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
या दुर्घटनेबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले की, नूतनीकरणानंतर आवश्यक फिटनेस सर्टिफिकेट आणि गरजेच्या परवानग्या न घेता हा पूल पुन्हा खुला केल्याचं गुजरात सरकारला का कळले नाही? अनेकांनी या दुर्घटनेत जीव गमावला आणि अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. गुजरातचे अधिकारी यातून स्वत:ची सुटका करू शकत नाहीत आणि पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या खासगी कंपनीसह तेही या घटनेस तितकेच जबाबदार आहेत असं सांगत केंद्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा आणि याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
still missing. #Gujarat authorities cannot absolve themselves from this incident and are equally responsible along with the private company that carried out #MorbiBridge renovation.
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) October 31, 2022
Central government must take this issue seriously and heads must roll in Gujarat government.(3/3)
काय आहे प्रकरण?
गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुलावर असलेले काही जण पुलाच्या तारा हलवत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही टवाळखोरांच्या उपद्रवामुळे ही घटना घडली तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
नुकतीच झाली होती दुरूस्ती
मोरबी येथील पूल रविवारी कोसळला तेव्हा त्यावर शेकडो लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नुकताच नूतनीकरण केलेला केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबतदेखील अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे.