मी स्वतःची ओळख का लपवू?; वर्णिकाचं चोख उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 11:29 AM2017-08-08T11:29:11+5:302017-08-08T11:33:03+5:30
शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती
चंदीगड, दि. 8- शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती. हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याने हा सगळा प्रकार केला होता. याप्रकरणी त्याला अटक झाली पण नंतर जामीन मिळाला. वर्णिका ही हरिणायाच्या आयएएस अधिका-याची मुलगी आहे. या प्रकरणी वर्णिका कुंडू हीने या संपूर्ण घटनेवर उत्तर दिलं आहे. वर्णिकाला तिच्यासोबत घडलेली घटना सगळ्यांना सांगायची आहे. छेडछाड प्रकरणातील पीडित मुली अनेकदा त्यांची ओळख लपवतात पण वर्णिकाला तिची ओळख लपवायची नाही. घडलेल्या घटनेला जराही घाबरलr नसल्याचं वर्णिलाला या प्रकरणातील गुन्हेगारांना दाखवून द्यायचं आहे.
मी माझी ओळखं का लपवू जर मी या घटनेतून वाचलेली मुलगी आहे, घटनेतील गुन्हेगार नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वर्णिकाने तिचं मत मांडलं आहे. चंदीगडच्या रस्त्यावर 25 मिनिटं माझा पाठलाग केल्यानंतर त्या दोघांनी पोलिसांसमोर माझी माफी मागितली आणि मी तक्रार करू नये यासाठी मला विनंती केली. पण या संपूर्ण प्रकरणात त्या दोघांना पाठिशी न घालता मी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, असं वर्णिकाने सांगितलं.
विकास बराला हा हरिणायाच्या प्रतिष्ठीत घरातील मुलगा आहे. इतकं होऊनही त्याला जामीन मिळण्याकडे वर्णिकाने फार लक्ष दिलं नाही. 'मी फक्त माझ्या एकटीला न्याय मिळावा यासाठी लढत नाही. तर याआधी ज्या मुलींसोबत असा प्रकार घडला आहे. त्यांच्यासाठीसुद्धा ही लढाई आहे. यापुढे मुलींबरोबर असा प्रकार करताना मुलं विचार करतील, असं वर्णिका म्हणाली आहे. भाजपच्या अधिकाऱ्यांनी वर्णिकाच्या राहणीमानाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून तिनं नाराजी व्यक्त केली आहे. चंदीगडमध्ये वर्णिका डीजे म्हणून काम करते. तिथे मोजक्याच मुली डीजे आहेत त्यात वर्णिका आहे.
त्या दिवशी रात्री उशिरा मी त्या रस्त्यावर काय करत होती ? हे मला विचारण्यापेक्षा त्या मुलांनाही विचारा त्यांनी काय केलं ? असं उत्तर तिने दिलं आहे. चंदीगड भाजपाचे उपाध्यक्षांनी वर्णिकाविषयी केलेल्या विधानावर उत्तर देताना तिने हे उत्तर दिलं. रात्री उशिरा वर्णिकाने बाहेर थांबायला नको होतं, असं ते म्हणाले होते.
काही जणांनी सोशल मीडियावरून वर्णिकावर टीका करण्याचा प्रयत्न केला. तिच्या फेसबुकवरील जुन्या फोटोंवरून तिच्यावर टीका करण्याचा प्रयत्न झाला. वर्णिका विकासला आधीपासून ओळखत होती, असं मत सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आलं. तिचा एक मित्र विकास सारखा दिसतो यावरूनच लोकांनी हा निष्कर्ष काढला. पण सोशल मीडियावर माझे जे फोटो पोस्ट करण्यात आले त्या फोटोतील व्यक्ती वेगळी आहे. माझे जुने फोटो पोस्ट करून माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला, असं वर्णिकाने सांगितलं आहे.
डीजे असण्याव्यतिरीक्त वर्णिका कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. कराटे प्रशिक्षणाचा फायदा मला त्या घटनेच्या दिवशी झाल्याचं ती म्हणाली. मुलींनी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घ्यायला हवं म्हणजे अशा प्रकारच्या घटना त्यांना हाताळता येतील, असंही वर्णिकाने म्हंटलं आहे. माझ्यासोबत जे घडलं त्यासाठी आरोपी दोघांना शिक्षा व्हायलाच हवी, त्याशिवाय मला आनंद मिळणार नाही, असं तिने म्हंटलं आहे.