अन्वयार्थ: पैशासाठी लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्ड्यांत का पडतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 09:34 IST2025-02-01T09:34:33+5:302025-02-01T09:34:53+5:30

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून 'पॉन्झी' योजनांमध्ये लोक पैसे का गुंतवतात? शहाणे कसे होत नाहीत?

Why do people fall into the same pits again and again for money | अन्वयार्थ: पैशासाठी लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्ड्यांत का पडतात?

अन्वयार्थ: पैशासाठी लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्ड्यांत का पडतात?

अमित बिवलकर, वित्तीय बाजारांचे विश्लेषक, गुंतवणूक सल्लागार |

कमीत कमी काळात भरघोस आर्थिक परताव्यांचे आमिष देऊन गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या योजना (पॉन्झी) 'लाभ' आणि 'लोभ' यातील पुसट रेषा सहज ओलांडून जाणाऱ्या मानसिकतेचे अपत्य आहे. सध्या मुंबईतील 'टोरेस'मागोमाग छ. संभाजीनगरमध्ये असा एक नवा घोटाळा उघडकीला आला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमावली, शिक्षण आणि जनजागृती यांचा समन्वय आवश्यक आहे. अशा फसवणुकीचे अनेक प्रकार सातत्याने उघड होत असूनही लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्यात का पडतात? जास्त परताव्याच्या मागे का धावतात? याचे कारण मानसशास्त्र, सामाजिक आणि आर्थिक घटकांमध्ये आहे.

नक्की काय घडते?
लोभ आणि अतिआत्मविश्वास या मानसिकतेच्या बळावर अशा योजनांचे सापळे उभे राहतात. जास्त परताव्याचे वचन लोभ जागा करते
आणि यामुळे विवेकबुद्धी कमी होते. अनेक लोक 'लवकर गुंतवणूक करून लवकर बाहेर पडू,' असे समजतात आणि स्वतःला या फसवणुकीपासून वाचवू शकतो, असा भ्रम तयार करतात. यशस्वी गुंतवणूकदारांच्या (अनेकदा खोट्या) गोष्टी ऐकून लोक घाईगडबडीत गुंतवणूक करतात, कारण त्यांना वाटते की, त्यांनी चांगली संधी गमावली तर? लोक जास्त परताव्यावर लक्ष केंद्रित करतात आणि जोखमीकडे दुर्लक्ष करतात. जास्त परताव्याबाबत कोणतीही हमी शक्य नाही, हे त्यांना उमजत नाही.

अनेकदा स्थानिक विक्रेत्यांवरचा विश्वास महत्त्वाचा ठरतो. अशा योजना प्रभावशाली स्थानिक व्यक्ती किंवा परिचितांच्या माध्यमातून प्रचारित केल्या जातात. त्यामुळे खोटा विश्वास निर्माण होतो. आजूबाजूचे, ओळखीचे, परिचयातले इतर लोक गुंतवणूक करताना दिसले, तर 'आपणही गुंतवू पैसे' असे वाटण्याची शक्यता जास्त असते. जे गुंतवणूकदार सुरुवातीला पैसे मिळवतात (प्लॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यात), ते इतरांना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे योजना वेगाने पसरते. कठीण आर्थिक परिस्थितीत, लोक आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी लवकर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कमी बैंक व्याजदर आणि अस्थिर बाजारामुळे 'परताव्यांची खात्री' देणाऱ्या 'पॉन्झी' योजना हा अनेकांना अधिक सोपा आणि फायदेशीर पर्याय वाटतो. लोकांना जलद परताव्याची लालसा अधिक असते. पारंपरिक बचत किंवा गुंतवणूक कमी परतावा देत असल्याने लोक अशा योजनांकडे वळतात.

फसवणूक सहज शक्य का होते?
गुंतागुंतीच्या आणि बोजड तांत्रिक आर्थिक शब्दांचा वापर करून योजनांमध्ये अंतर्भूत असलेली फसवणूक अनेकदा बेमालूमपणे लपवली जाते. अशा योजना 'फक्त निवडकांसाठी' असल्याचा आभास निर्माण करून गुंतवणूकदारांना विशेष वाटण्यास भाग पाडतात. खोट्या गुंतवणूकदारांच्या कथा प्रचारित करून लोकांचा आत्मविश्वास वाढवला जातो. सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना नवीन सदस्यांकडून
मिळालेल्या निधीने परतावा दिला जातो, ज्यामुळे योजना विश्वासार्ह वाटते.

सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना दिले जाणारे परतावे हे नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळे या योजनेसाठी सतत नवीन गुंतवणूकदारांची गरज असते, जी दीर्घकाळ टिकवता येत नाही. शेवटी, योजना अशा टप्प्यावर पोहोचते जिथे ती पूर्वीच्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी पुरेसा नवीन पैसा मिळवू शकत नाही. जेव्हा पुरेसा निधी येणे थांबते, तेव्हा योजना कोसळते आणि उशिरा गुंतवणूक केलेल्या लोकांना नुकसान सहन करावे लागते. सर्वसामान्यपणे, अशा योजना चालवणारी व्यक्ती किंवा संस्था शिल्लक रक्कम घेऊन पळून जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही.

हा चक्रव्यूह भेदण्यासाठी उपाय
सरकार, नियामक संस्था आणि आर्थिक सल्लागारांनी गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन, आणि फसवणूक ओळखण्यावर जनतेला शिक्षित करणे गरजेचे आहे. फसवणूक योजनांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई केली गेली पाहिजे. म्युच्युअल फंड, 'पीपीएफ' यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांना प्रोत्साहन असले पाहिजे. 'जर ते खूपच चांगले वाटत असेल तर ते खरे नसण्याची शक्यता जास्त आहे' हे सार्वकालिक सत्य होय!

Web Title: Why do people fall into the same pits again and again for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.