घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:58 PM2022-12-03T12:58:44+5:302022-12-03T12:59:52+5:30

वर्षभरापासून खरेदीदार येईना : वास्तव्यास असलेले पोकिया कुटुंब ‘व्हिजिटर्स’ने त्रस्त

Why do you take a house, a house....Barry. Mohammad Ali Jinnah's house is for sale in gujarat | घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

googlenewsNext

कमलेश वानखेडे/ 
नंदकिशोर पुरोहित 

पनेली मोटी (राजकोट) :  पाकिस्तानच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे पनेली मोटी (जि. राजकोट) येथील घर विकायला काढले आहे. येथे तीन पिढ्यांपासून राहणारे पोकिया कुटुंब या घराला भेट देण्यासाठी येणाऱ्या ‘व्हिजिटर्स’ने त्रस्त झाले आहे. त्यांना हे घर विकून गावात मोक्याच्या जागी नवे घर बांधायचे आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून एकही खरेदीदार मिळाला नसल्याने पोकिया कुटुंब नाराज आहे.  

उपलेटा तालुक्यात पनेली मोटी हे सुमारे १८ हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील आझाद चौकात असलेल्या एका जुन्या घरी बॅरि. जिना  यांचा जन्म झाला. फाळणीनंतर जिना यांचे कुटुंबीय पाकिस्तानात निघून गेले व पोकिया कुटुंबाला या घराची मालकी मिळाली. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या घराला भेट दिली. सध्या नंदुबेन पोकिया यांच्या नावाने हे घर असून, मालकीची कागदपत्रेही त्यांच्याच नावाने आहेत. सध्या या घरात नंदुबेन यांच्यासह त्यांचा मुलगा प्रवीणभाई, पत्नी शोभा व दोन मुले असे पाचजण राहतात.

‘लोकमत’चा चमू घरी पोहोचला तेव्हा शोभा पोकिया (सून) या भाजी तोडत होत्या. पती प्रवीणभाई शेतावर कामासाठी गेले होते.  शोभाताई म्हणाल्या, दररोज देशभरातून कुणी ना कुणी हे घर पाहायला येतात. त्यामुळे आमची कामे खोळंबतात. दुपारी घटकाभर झोप घ्यायला गेले की कुणी ना कुणी बाहेरच्या दाराची कडी वाजवतो. आलेल्या प्रत्येकाला सर्व माहिती द्यावी लागते. आता आमच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. त्यांचे शिक्षण व पुढे लग्न करायचे आहे. त्यामुळे हे जुने घर विकून गावातच मोक्याच्या ठिकाणी दुसरे घर बांधायचे आहे. घराची किंमत विचारली असता ‘वो इनको पता है’ असे सांगत किंमत गुलदस्त्यातच ठेवली.  

अधिकारी घर पाहून गेले; पण पुढे काहीच नाही  
शोभाताई म्हणाल्या, एक-दोन वेळा येथील अधिकारी आले. मोजणी केली. फोटो काढले. घर पाहून गेले; पण पुन्हा काही परतले नाही. प्रशासनातील कुणी अधिकारी येईल व या घराचा सोक्षमोक्ष लावतील, या आशेवर त्या वाट पाहत आहेत.

२२ वर्षांत पाकिस्तानहून कुणीच आले नाही! 
nशोभाताई म्हणाल्या, माझ्या लग्नाला २२ वर्षे झाली. या काळात पाकिस्तानातून कुणीच जिनांचे हे घर पाहायला आल्याचे आठवत नाही. 
nहिंदुस्तानमधून मात्र बरेच लोक येतात. कुतूहलाने घर पाहतात. फोटोही काढतात. जिनांचे घर येथे कुणी विकत घेत नसल्यामुळे पाकिस्तानातून कुणी खरेदीसाठी आले तर त्यांना विकू, असेही त्या नाराजीतून म्हणाल्या. 

Web Title: Why do you take a house, a house....Barry. Mohammad Ali Jinnah's house is for sale in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.