...मग कमनशीबींना मतदान का करायचे ? - मोदी
By admin | Published: February 1, 2015 05:38 PM2015-02-01T17:38:01+5:302015-02-01T17:54:49+5:30
माझ्या नशीबामुळे देशवासीयांच्या खिशात पैशांची बचत होणार असेल तर मग कमनशीबींना मतदान का करायचे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - मी सत्तेवर आल्यापासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्त्याने कमी होत आहेत. मी नशीबवाला असल्याने कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचे विरोधक म्हणतात. पण जर माझ्या नशीबामुळे देशवासीयांच्या खिशात पैशांची बचत होणार असेल तर मग कमनशीबींना मतदान का करायचे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. तर पंतप्रधानांनी केजरीवाल यांचा कमनशीबी म्हणून उल्लेख करणे हे डर्टी पॉलिटीक्स असून आता दिल्लीकरच यावर प्रत्युत्तर देतील अशी प्रतिक्रिया आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिली आहे.
रविवारी भर थंडीतही दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत प्रचारसभांचा धडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे प्रचारसभा घेतली. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले होते. आता ते दोघेही दररोज भाजपावर खोटे आरोप करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. टीव्हीवर दिसण्यासाठी पक्ष स्थापन केले जात नाही. सरकार चालवणे ही महत्त्वाची जबाबदारी असून तिथून पळ काढता येत नाही असा चिमटा मोदींनी केजरीवाल यांना काढला. तर गेली अनेक वर्ष गरिबांना गरिब ठेवून राजकारण केले जात आहे असा आरोप करत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
मोदींनी दिलेल्या आश्वासनांच काय ? - गांधी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील बदरपूर येथे रविवारी प्रचारसभा घेतली. काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु, तरुणांना रोजगार देऊ अशी आश्वासनं मोदींनी दिली होती. या आश्वासनांचे काय झाले असा खोचक सवाल सोनिया गांधी यांनी विचारला. तर काँग्रेसने चांगल्या प्रशासनासाठी केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. मात्र ते जबाबदारी सोडून पळून गेले अशी आठवण त्यांनी करुन दिले. आम आदमी पक्ष दिखाव्याचे राजकारण करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला.
मोदी सरकारच्या काळात बलात्कार वाढले - केजरीवाल
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. २०१३ मध्ये दिल्लीत बलात्काराच्या १,५७१ घटना घडल्या होत्या. तर २०१४ मध्ये हेच प्रमाण २,०६९ पर्यंत पोहोचले असा दावा केजरीवाल यांनी केला. मोदी सरकारच्या काळात बलात्काराच्या घटनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून ओबामांच्या सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही आता काढले जात असल्याचे समजते असा आरोपही त्यांनी केला.