पेन्शनचे पैसे घेण्यासाठी टोपलीत बसून आली महिला; सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:04 AM2023-05-25T11:04:42+5:302023-05-25T11:10:26+5:30
एका कुटुंबातील वृद्ध महिला तिची पेन्शन घेण्यासाठी टोपलीत बसून महुआदंड ब्लॉक मुख्यालयात आली.
झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं, ज्याने सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश केला. एका कुटुंबातील वृद्ध महिला तिची पेन्शन घेण्यासाठी टोपलीत बसून महुआदंड ब्लॉक मुख्यालयात आली. महिलेचा नवरा आणि तिचा मुलगा तिला टोपलीत बसवून खांद्यावरून घेऊन आले होते. यामागचं कारण हैराण करणारं आहे. गावात रस्ता तयार झाला नसल्याने त्रस्त झालेल्या कुटुंबाने वृद्ध महिलेला टोपलीतून आणण्यात आले.
झारखंडमधील या घटनेने सरकारच्या विकास योजनांचा पर्दाफाश झाला आहे. एकीकडे झारखंड सरकार गावागावात पक्के रस्ते बनवण्याचा दावा करत आहे. पण दुसरीकडे लातेहार जिल्ह्यातील महुआदंड ब्लॉकमध्ये अजूनही अशी अनेक गावे आहेत, जिथे पक्के रस्ते नाहीत. तसेच कच्चा रस्ताही तिथे बांधला गेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्वालखंड हे असेच एक गाव आहे. या गावात आजपर्यंत रस्त्याचे बांधकाम न झाल्यामुळे आजही ग्रामस्थांना पायीच गावात ये-जा करावी लागत आहे. विकासाच्या नावाखाली धावणारी वाहने आजही या गावापासून दूर आहेत. मुख्यालयापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात सायकलनेही पोहोचणे कठीण आहे. या कारणामुळे वृद्ध महिलेला टोपलीत आणावे लागले.
चालता येत नसल्याने लालो कोरबा या महिलेला तिचे पती देवा कोरबा आणि मुलगा सुंदरलाल कोरबा यांनी पेन्शनचे पैसे काढण्यासाठी एका टोपलीतून महुआदंड येथे आणले. मात्र, बँकेमध्ये लिंक फेल झाल्याने महिलेला पेन्शनही मिळू शकले नाही. त्यामुळे तिला विनाकारण घरी परतावे लागले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.