श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेमका कृष्णशिळेचाच वापर का?; जाणून घ्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 07:16 AM2024-01-23T07:16:25+5:302024-01-23T07:18:39+5:30
नेमका याच पाषाणाचा का वापर झाला, याबाबत जाणून घेऊ या...
प्रभू श्रीराम अखेर अयाेध्येतील श्रीराम मंदिरात विराजमान झाले. श्रीरामांची संपूर्णपणे सजविण्यात आलेली मूर्ती पाहताक्षणी मन माेहून जाते. ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण याेगीराज यांनी घडविली आहे. या मूर्तीसाठी काळ्या किंवा श्यामल रंगाच्या कृष्णशिळा पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. नेमका याच पाषाणाचा का वापर झाला, याबाबत जाणून घेऊ या...
श्रीरामांची मूर्ती कृष्णशिळा या पाषाणापासून बनविण्यात आली आहे. म्हैसूर व जवळच्या भागात अशा प्रकारचे पाषाण विपुल प्रमाणात आढळतात. वाल्मीकी रामायणात बालरूपी श्रीराम हे श्यामवर्णी, काेमल, सुंदर आणि आकर्षक असल्याचा उल्लेख आहे. म्हणूनच मूर्तीसाठी श्यामल रंगाचा पाषाण वापरला. पाषाणाला हजाराे वर्षे काहीही हाेत नाही. अभिषेक व पूजेदरम्यान जल, चंदन, दूध इत्यादींचा वापर केला जाताे. यांचा पाषाणावर परिणाम हाेणार नाही व मूर्तीचेही नुकसान हाेणार नाही. या पाषणाची रचना मऊ असते. मात्र, २-३ वर्षांच्या कालावधीत पाषाण अतिशय कठीण हाेताे. पाषणावर आधी आकृती काढण्यात येते आणि नंतर त्यानुसार काेरीव काम केले जाते.